पुणे : चित्रपटांमध्ये नवनिर्मितीचे आव्हान : बाल्की

पुणे : चित्रपटांमध्ये नवनिर्मितीचे आव्हान : बाल्की

पुणे : "खऱ्या आयुष्यापेक्षा अधिक चित्तवेधक गोष्टी मांडता येत असल्याने चित्रपट हे शक्तिशाली माध्यम आहे. सध्या लोकांच्या आयुष्यातच लक्षवेधी आणि विचित्र गोष्टी घडत आहेत. अशा परिस्थितीत वेगळेपण जपून नवनिर्मिती करणे हे लेखक, दिग्दर्शकांपुढील आव्हान आहे,'' असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक आर. बाल्की यांनी व्यक्त केले. 

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने आयोजित केलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

तेंडुलकरांविषयी बाल्की म्हणाले, "तेंडुलकर हे खूप धाडसी लेखक होते. ते त्यांचे विचार मांडायला कधी घाबरले नाहीत. बाहेरच्या जगात अशांतता, गोंधळ असतानाही तो त्यांना कधीच अशांत करू शकला नाही. उलट त्याचा वापर त्यांनी आणखी कलात्मक निर्मितीसाठी केला.'' 

सिनेमा बनवणे हे ध्येय असल्याने जाहिरातींच्या वाटेने या क्षेत्रात शिरलो. या जाहिरातींच्या क्षेत्राने चित्रपटाचे पायाभूत ज्ञान देत बरेच काही शिकवले, त्यातून घडत गेलो, असे बाल्की यांनी सांगितले. मला चित्रपटाच्या आकृतिबंधाला चिकटून राहायला आवडत नाही, तर कथाच महत्त्वाची वाटते. तुमच्याकडे जर सांगण्यासारखे काही नसेल तर चित्रपट बनवण्यात अर्थ नाही, असे सांगत चीनी कम, पा, पॅडमॅन, मिशन मंगल या चित्रपटांचे काही किस्से त्यांनी सांगितले. 

एका प्रकारच्या प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवत आहे, असे सांगणे मला चुकीचे वाटते. कारण जेव्हा असे कोणी म्हणते, त्यांना त्या गटातील प्रेक्षकांना काय हवे आहे, काय आवडू शकेल, हे कितपत समजलेले असते, याविषयी शंका आहे. जेव्हा कथा, संहिता लिहिली जाते आणि ती चित्रपटातून बाहेर प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही, तोवर हे दावे मला अतिशयोक्तीचे वाटतात, असे प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केले. 

इलियाराजा यांच्या संगीतात सिनेमा

संगीतकार इलियाराजा व चलचित्रकार पी. सी. श्रीराम यांच्याविषयी बाल्की म्हणाले, ""कलेचे मूलतत्त्व जोपासणारे कलाकार सापडणे फार कठीण आहे. हे दोन कलाकार त्यातील आहेत. इलियाराजा यांचे संगीत मला फार भावते. त्यांचे संगीत मला प्रेरणा देते. ते ऐकताना एखादी कथा किंवा कथेतील घटना सुचते. त्यांच्या संगीतात पूर्ण सिनेमा आहे, असे मला वाटते.'' 

'पिफ'मध्ये काय पाहाल 

ह्युमरिस्ट : सिनेमा हे अभिव्यक्त होण्याचे एक माध्यम. पण त्यावरही सेन्सॉरशिपद्वारे बरीच बंधने येतात. या बंधनावर भाष्य करणारा ह्युमरिस्ट हा सिनेमा. एका रशियातील स्टॅंडअप कॉमेडियनला सेन्सॉरशिपच्या नावाखाली सहन कराव्या लागणाऱ्या बंधनावर, त्याच्या स्वातंत्र्याच्या संकोचावर हा सिनेमा बोलतो. 

द पेंटेड बर्ड : जेर्झी कोझिन्स्की याच्या कादंबरीवर बेतलेला हा सिनेमा आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एक ज्यू मुलगा पूर्व युरोपमध्ये नातेवाइकांकडे आश्रयाला जातो. पण नातेवाइकाचा अचानक मृत्यू झाल्याने या भयानक परिस्थितीमध्ये त्याला स्वत:चे रक्षण स्वत:च करावे लागते. या प्रवासात त्याच्या वाट्याला अनेक बरेवाईट प्रसंग येतात. त्याचे हे चित्रण. 

बिनपोल : दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रशियातील लेनिनग्राड अक्षरश: उद्‌ध्वस्त झाले होते. नागरिक शारीरिक जखमांबरोबरच मानसिक जखमांनी "रक्तबंबाळ' झालेले होते. या काळात जगण्या-मरण्याचे युद्धच अनेकांनी अनुभवले. अशा उद्‌ध्वस्त स्थितीतही दोन तरुण महिला आयुष्य पुन्हा बांधण्यासाठी उभ्या राहतात. बिनपोलमधून मानवी जगण्याचे वास्तव पाहायला मिळते. 

होमवर्ड : रशिया आणि युक्रेनच्या युद्धात एक बाप मोठ्या मुलाला गमावतो. त्याच्या पार्थिक आपल्या मूळ गावी नेण्याचा निर्णय घेतो. या प्रवासात बाप आणि लहान मुलाच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com