नाल्यांवरील उद्याने पालिकेच्या रडारवर

Garden
Garden

पुणे - ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणांना पायबंद बसावा तसेच शहराच्या सौंदर्यात भर म्हणून पंधरा वर्षांपूर्वी महापालिकेने ‘नाला गार्डन’ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवत सात ठिकाणी उद्याने साकारली. मात्र, आता हीच उद्याने पुराला कारणीभूत ठरत असल्याचा निष्कर्ष महापालिकेनेच काढला आहे. त्यामुळे ती काढण्याच्या हालचाली एकीकडे सुरू आहेत, तर दुसरीकडे ती काढणे चुकीचे असल्याची भूमिका उद्यान विभागाने घेतली आहे.

आंबिल ओढ्यावरील ‘नाला गार्डन’ धोकादायक असल्याचा ठपका महापालिकेने पाहणीनंतर ठेवला आहे. तर दुसरीकडे, या गार्डनमुळे पाणी कुठेच अडत नाही, असा दावा महापालिकेचेच उद्यान खाते करीत आहे. परिणामी, ‘नाला गार्डन’वरून महापालिकेचे अधिकारी वेगवेगळी भूमिका घेत आहेत.

लोकवस्त्यांमधून वाहणाऱ्या आंबिल ओढ्यावर व्यावसायिक अतिक्रमणांसोबत नाला गार्डन उभारल्याने ओढा आक्रसला असून, त्याची रुंदी २० मीटरवरून जेमतेम ५ मीटरपर्यंत कमी झाल्याचे पाहणीतून उघड झाले आहे. ही पाहणी करताना सुरक्षिततेचे उपायही महापालिका करीत आहे. ‘नाला गार्डन’मुळे ओढ्याची पूरवहन क्षमता कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हे गार्डनच काढण्याची भूमिका महापालिका घेत आहे.

‘नाला गार्डन’चा उद्देश
ओढ्या-नाल्यांवर अतिक्रमणे होत असल्याने त्यावर उपाय म्हणून ‘नाला गार्डन’ची कल्पना पुढे आली. त्यानुसार २००३-४ पासून या नाल्यांची बांधणी करण्यात आली आहे. मात्र, ते करताना कुठेही बांधकाम करण्यात आलेले नाही, असा दावा महापालिकेच्या उद्यान खात्याचा आहे. शिवाय, नालेही वळविण्यात आलेले नाहीत. या प्रकारच्या नाल्यांमुळे पाण्याचा प्रवाह सुरक्षित आहे, असेही खात्याचे म्हणणे आहे.

‘नाला गार्डन’ काढणे अयोग्य
‘नाला गार्डन’मध्ये लोकांसाठी सुविधा उभारल्या असून, त्यात ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासह ‘जाँगिंग ट्रॅक’ तयार केले आहेत. शिवाय, झाडेही लावण्यात आली आहेत. त्यामुळे गार्डनला लोकांची पसंती मिळाल्याने ओढे-नाले सुरक्षित राहिले आहेत. मात्र, ते पूरस्थितीला कारणीभूत असल्याचे सांगून काढणे योग्य नाही, असे उद्यान खात्यातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

गार्डनमुळे प्रवाहाला अडथळा - उपायुक्त कुलकर्णी
‘नाला गार्डन’मुळे ओढ्याची रुंदी कमी झाली असून, त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत. आंबिल ओढा पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी अतिक्रमणे काढावी लागणार आहेत. ज्यामुळे या ओढ्याचे मूळ पात्र २० मीटरपर्यंत नेणे शक्‍य होणार आहे. त्याबाबत संबंधित खात्याशी प्राथमिक चर्चा सुरू आहे, असे महापालिकेचे उपायुक्त व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.

पूर येऊ नये, यासाठी ओढ्या-नाल्यांवर उपाय करीत आहोत. ‘नाला गार्डन’मुळे अडचणी येत असतील, तर त्या दूर केल्या जातील. मात्र, ‘नाला गार्डन’ची स्वतंत्र पाहणी करून त्याबाबतचा निर्णय घेऊ.
- रुबल अगरवाल, प्रभारी आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com