'देवाची दुनिया श्रीमंत झाली आणि आमची उजाड'; राहुल देशपांडे यांनी व्यक्त केला शोक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 August 2020

मेवाती घराण्याचे संगीतमार्तंड पंडित जसराज (वय 90) यांनी आज अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये अखेरचा श्‍वास घेतला. स्थानिक प्रमाणवेळेनुसार आज पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी जसराज यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले.

पुणे - हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताभोवती स्वर्गीय अशा भक्तीरसपूर्ण सुरांची आरास उभी करणारे, मेवाती घराण्याचे संगीतमार्तंड पंडित जसराज (वय 90) यांनी आज अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये अखेरचा श्‍वास घेतला. स्थानिक प्रमाणवेळेनुसार आज पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी जसराज यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची कन्या दुर्गा जसराज यांनी त्याबाबतची माहिती दिली. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, नितीन गडकरी आदी मान्यवरांसह कला, संगीतक्षेत्रातील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. 

गायक राहुल देशपांडे यांनीही जसराज यांच्या जाण्याने मोठा धक्का बसल्याचं म्हटलं आहे. बापुजी आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही. हे धक्कादायक आहे. संगीतातून ते नेहमीच आपल्यासोबत असतील. देवाची दुनिया श्रीमंत झाली आणि आमची उजाड अशा शब्दांत राहुल देशपांडे यांनी श्रद्धांजली वाहिली. 

पंडित जसराज यांचा परिचय
हरियाणातील हिसार जिल्ह्यातील पिली मांडोरी खेड्यामध्ये जन्मलेल्या पंडितजींनी बालवयातच संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. जसराज यांचे वडील पंडित मोतीराम हेही शास्त्रीय गायक होते. वडिलांचे निधन झाले तेव्हा जसराज केवळ चार वर्षांचे होते. पुढे जसराज यांनी त्यांचे बंधू पंडित प्रताप नारायण यांच्यासोबत सूरसाधना केली. तरुणपणी हैदराबादेत वास्तव्यास असलेल्या पंडितजींनी गुजरातमधील साणंद येथे मेवाती घराण्याच्या तालमीमध्ये संगीत आराधना केली. तबल्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास हा पुढे सुरांपर्यंत पोचला. अनेकदा साणंदच्या राजदरबारामध्ये देखील पंडितजींच्या गायकीच्या मैफली रंगल्या.

1949 मध्ये कोलकत्याला गेलेल्या पंडितजींनी आकाशवाणीसाठी गायन सुरू केले. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा शांताराम या पंडितजींच्या अर्धांगिनी होत. संगीतक्षेत्रातील अभूतपूर्व अशा योगदानाबद्दल पंडित जसराज यांना अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. भारत सरकारने त्यांचा पद्मश्री, संगीत नाटक अकादमी, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पुरस्कारांनी गौरव केला होता. एका लघुग्रहालाही जसराज यांचे नाव देण्यात आले होते. 

भक्तिरसाचा अविष्कार 
‘भक्तिरस’ हा जसराज यांच्या गायकीचा प्राण, ८० वर्षांच्या संगीत कारकिर्दीमध्ये त्यांच्या असंख्य मैफली गाजल्या त्या बंदिशींमुळे. आपल्या गायनाच्या माध्यमातून रसिकांना भावार्थाची ओळख करून देणाऱ्या पंडितजींनी सुरांची उत्कटता नेमकेपणाने दाखवून दिली. संथ, दीर्घ, धीरगंभीर आणि आलापी हे जसराज यांच्या गायनाचे वैशिष्ट्य होते. मंद्र सप्तकातील स्वरावली, तारषड्ज यांच्यावर त्यांचे प्रभुत्व होते, त्यांच्या गायनातील सरगमचा संचार अनेक कलासंशोधकांसाठी आजही अभ्यासाचा विषय आहे. जसराज यांच्या संगीताने रसिकांच्या कानांना केवळ तृप्तीच दिली नाही तर, रागसंगीताचे शास्त्र माहीत नसणाऱ्या रसिकांना देखील मैफलीमध्ये खेचून आणले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul deshpande condolence on pandit jasraj demise