आजोबांच्या वारशाची मोठी जबाबदारी

आजोबांच्या वारशाची मोठी जबाबदारी

पुणे  - माझ्या आजोबांना शास्त्रीय गायक म्हणून म्हणावी तशी ओळख मिळाली नाही. ते एक उत्कृष्ट शास्त्रीय गायक असतानाही त्यांच्यावर नाट्य संगीत गायकाचा शिक्का बसला. त्यांच्या ज्या-ज्या गोष्टी अपूर्ण राहिल्या आहेत, त्या सर्व पूर्ण करण्यासाठी माझा जन्म झाला आहे. त्यांच्या वारशाची माझ्यावर मोठी जबाबदारी आहे, असे गायक राहुल देशपांडे यांनी सांगितले. त्यांचे आजोबा ज्येष्ठ गायक वसंतराव देशपांडे यांची २ मे ला जन्मशताब्दी सुरू होत आहे. त्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या अनेक गोष्टी उलगडत आठवणींना उजाळा दिला.

 वसंतराव देशपांडे यांनी अनेक घराण्यांची गायकी आत्मसात केली होती. त्यांच्या गायकीची अशी कोणती गोष्ट आहे जी आजच्या पिढीसाठी गरजेची आहे?
राहुल - वसंतरावांचे गाणे काळाच्या ५० ते ७० वर्षे पुढे होते. जे काही चांगले मिळाले ते सर्व त्यांनी ग्रहण केले. त्यांची सौंदर्यदृष्टी खूप चांगली होती.  त्यांच्याबाबत पु. ल. देशपांडे एकदा म्हणाले होते, ‘‘वसंता तुझा मेंदू तुझ्या गळ्याचा गुलाम आहे.’’ त्यामुळे त्यांच्या गाण्याने सामान्य माणसापासून संगीतातल्या तज्ज्ञापर्यंत सर्वांचे रंजन व्हायचे.

 त्यांची गायकी लोकांना कळली नाही का?
राहुल - लोकांना त्या काळात त्यांची गायकी पचली नाही. कलेच्या बाबतीत ते अतिशय खुल्या विचारांचे असले तरीही लोकांची मानसिकता बंदिस्त होती. त्यामुळे लोकांकडून नवीन गोष्टी स्वीकारायला वेळ लागला. तोपर्यंत त्यांच्या गाण्यासाठी प्रत्येकाची दारे बंद होती. यासाठी वसंतराव नेहमी म्हणायचे, ‘‘माझा गळा चांगला होता तोपर्यंत कोणी गाणे ऐकले नाही. आता गळ्याचे नरडे झाल्यावर ऐकता हे तुमचे दुर्दैव.’’

वसंतराव यांचा एकूण प्रवास पाहता त्यांच्या आयुष्याचे आणि कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकाच्या आशयामध्ये काही साधर्म्य होते का? 
राहुल - ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकातील खाँ साहेबांची गायकी अतिशय दुर्मीळ असली तरीही पंडीतजींच्या गायकीची लोकांना सवय झाल्याने खाँ साहेबांचे गाणे ते स्वीकारू शकले नाहीत. वसंतराव यांच्या बाबतीतही असेच झाले; परंतु कालांतराने त्यांची गायकी लोकांच्या पसंतीस उतरून रूढ झाली. 

तुमची त्यांच्यासोबत असणारी एखादी आठवण कोणती? त्यांच्या आयुष्यात कोणती गोष्ट राहून गेलेली आहे जी तुम्हाला पूर्ण करावीशी वाटते?
राहुल - आजोबा माझ्या वडिलांना नेहमी म्हणायचे, ‘‘तुझा मुलगा मला दत्तक दे. तो माझी गादी पुढे चालवणार आहे.’’ शास्त्रीय संगीत गायक म्हणून त्यांना म्हणावी तशी ओळख मिळाली नाही. उत्कृष्ट शास्त्रीय गायक असतानाही संगीत नाटकातील गायकीचा शिक्का त्यांच्यावर बसला. त्यामुळे त्यांची स्वप्ने आणि इच्छा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी माझी आहे. त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी माझा जन्म झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com