राहुल कुल ७४६ मतांनी विजयी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

दौंड- दौंड विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार तथा विद्यमान आमदार राहुल कुल हे अवघ्या ७४६ मतांच्या निसटत्या फरकाने विजयी झाले आहेत. दौंड मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचा उमेदवार विजयी झाल्याने जल्लोष करण्यात आला आहे.

दौंड- दौंड विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार तथा विद्यमान आमदार राहुल कुल हे अवघ्या ७४६ मतांच्या निसटत्या फरकाने विजयी झाले आहेत. दौंड मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचा उमेदवार विजयी झाल्याने जल्लोष करण्यात आला आहे.

शहरातील नगर मोरी येथील धान्य गोदामात सकाळी साडेआठ वाजता मतमोजणीस सुरवात झाली. दौंड मतदारसंघातील ३,०९,१६८ मतदारांपैकी २,१२,४१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये १,१४,२२२ पुरुष; ९८,१९२ महिला व १ तृतीयपंथीय यांचा समावेश आहे. मतमोजणीदरम्यान निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांनी दुपारी अडीच वाजता जेवणासाठी विश्रांती घेतल्याने सर्वांचा जीव टांगणीला लागला होता. प्रशासकीय ढिसाळपणा आणि मतमोजणीला होणाऱ्या विलंबामुळे कार्यकर्ते व समर्थकांच्या काळजाचा ठोका चुकत होता. समाजमाध्यमांद्वारे चुकीची आकडेवारी पसरविण्यात आल्याने आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांच्या समर्थकांनीदेखील दुपारी तीनच्या दरम्यान गुलाल उधळला होता.

पहिल्या फेरीत राहुल कुल यांना ४६१०, पाचव्या फेरीअखेर ६३३९, दहाव्या फेरीअखेर ६६२०, पंधराव्या फेरीअखेर ४३०८, विसाव्या फेरीअखेर ५२५, एकविसाव्या फेरीअखेर ४८६ तर अंतिम फेरीअखेर ६७३ मतांची आघाडी मिळाली. टपाली मते आणि व्हीव्हीपॅट स्लिपांच्या मोजणीनंतर संध्याकाळी सहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी राहुल कुल ७४६ मतांनी विजयी झाल्याचे जाहीर केले. 

जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. पण, कुल यांचा केवळ ७४६ मतांनी विजय झाला आहे. तसा हा त्यांचा नैतिक पराभव आहे. लोकसभेला त्यांना तालुक्‍यातून अंदाजे ७ हजारांची आघाडी मिळाली होती. मात्र, आता केवळ ७४६ मतांवर समाधान मानावे लागले, याचा त्यांनी विचार करावा.
- रमेश थोरात, उमेदवार महाआघाडी

अंतिम निकाल 
राहुल कुल (भाजप - विजयी)  १,०३,६६४
रमेश थोरात (राष्ट्रवादी)      १,०२,९१८
इतर उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणे :
तात्यासाहेब ताम्हाणे 
(वं.ब.आ) २६३३
किसन हंडाळ (बसपा)  ०९३९
अशोक होले  (ब.मु.पा.)  ०८०३
रमेश थोरात (अपक्ष)  ०४६२
रमेश शितोळे (प्रहार)  ०४१८
उमेश म्हेत्रे (अपक्ष) ०११४
प्रतीक धनोकार (अपक्ष) ००८०
प्रल्हाद महाडिक (अपक्ष) ०१३६
मोहम्मद शेख (अपक्ष) ०२५३
लक्ष्मण अंकुश (अपक्ष) ०३५८
संजय कांबळे (अपक्ष)  ०३५३
नोटा  ०९१७


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul kul won by 746 votes