फादर स्टॅम स्वामींच्या रांचीतील घरावर छापा 

फादर स्टॅम स्वामींच्या रांचीतील घरावर छापा 

पुणे -  शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांच्या पथकाने बुधवारी सकाळी रांचीमध्ये फादर स्टॅन स्वामी यांच्या घरावर छापे टाकले. तेथून कागदपत्र आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यापूर्वीही स्वामी यांच्या घरावर पुणे पोलिसांनी छापा टाकला होता. 

भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दोन गटांत हिंसाचार उसळला होता. ही घटना घडण्यापूर्वी 31 डिसेंबर 2017 ला शनिवारवाड्यावर एल्गार परिषद झाली होती. त्यात नक्षलवाद्यांनी वित्तपुरवठा केल्याचा व त्यांनीच भीमा कोरेगाव येथे दंगल घडविल्याचा संशय होता. ऑगस्ट 2018 मध्ये एकाच दिवशी देशात अनेक ठिकाणी पुणे पोलिसांनी छापे टाकले. त्यात नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून सुधीर ढवळे, ऍड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. शोमा सेन, महेश राऊत आणि रोना विल्सन यांना अटक केली होती. दुसऱ्या टप्प्यात केलेल्या कारवाईत तेलुगू विद्रोही कवी वरवरा राव, अरुण परेरा, गौतम नवलाखा, सुधा भारद्वाज, वरनोन गोन्झाल्विज यांना अटक केली होती. याच काळात फादर स्टॅम स्वामी यांच्या रांचीतील घरावर छापे टाकले होते. त्यानंतर स्वामी यांच्याशी संबंधित माहिती पुढे आली. त्याबाबत अधिक पुरावे गोळा करण्यासाठी बुधवारी सकाळी सातच्या सुमारास स्वामी यांच्या निवासस्थानी पुन्हा छापा टाकला. 

सहायक आयुक्त शिवाजी पवार यांनी या कारवाईस दुजोरा दिला. आज सकाळी त्यांच्या घराची झडती घेतली आहे. यात काही महत्त्वाच्या वस्तू जप्त केल्या आहेत, असे पवार यांनी सांगितले. 

कोण आहेत स्वामी 
स्वामी मूळचे केरळ येथील रहिवासी आहेत. ते गेल्या काही वर्षांपासून झारखंडमधील रांचीजवळ असलेल्या नमकोम भागात राहत आहेत. नामकोम बेगई या संघटनेच्या माध्यमातून ते आदिवासींच्या प्रश्‍नासाठी लढत आहेत. तसेच नक्षलवादाच्या आरोपाखाली अटक करण्यात  आलेल्यांना सोडविण्यासाठी ते प्रयत्न करतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com