रेल्वे स्थानकाचा भुयारी मार्ग घाणीच्या विळख्यात

सुवर्णा कांचन
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

रेल्वे स्थानक व दत्त मंदिर परिसर रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत आहे. तिथे कायमस्वरूपी सफाई कर्मचारी कार्यरत आहे. भुयारी मार्ग हा महापालिकेचा भाग आहे. त्यामुळे तिथे आमची काहीच भूमिका नाही. 
 - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग

पुणे - पुणे रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गातील कचरा आणि घाणीतून प्रवाशांना वाट काढावी लागत आहे. हा परिसर महापालिकेच्या हद्दीत येत असल्याचा रेल्वे प्रशानाचा दावा आहे. तर भुयारी मार्गातील व्यावसायिकांकडेच स्वच्छतेची जबाबदारी असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या टोलवाटोलवीत याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहेत. 

पुणे रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गात ठिकठिकाणी कचरा, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, विविध पदार्थ खाऊन टाकलेली रिकामे पाकिटे प्रवाशांची स्वागत करत असतात. भुयारी मार्गाच्या भिंती व कोपरे पान, मावा, गुटखा खाऊन मारलेल्या पिचकाऱ्यांमुळे रंगल्या आहेत. ते पाहणाऱ्यांना किळस आणतात. विशेष म्हणजे या भुयारी मार्गात खाद्यपदार्थ विक्रीची अनेक दुकाने आहेत. तेथील पदार्थ उघड्यावरच ठेवलेले असतात. असंख्य प्रवासी येथेच उभे राहून ते पदार्थ खात असतात. मात्र रेल्वे प्रशासनाचे या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. 

रेल्वे स्थानकात असलेल्या सरकत्या जिन्यासमोरच खोदकाम करून राडारोड्याचे ढिगारे ठेवले आहेत. त्याचा प्रवाशांना त्रास होत असतो. येथील जिना अनेक दिवसांपासून बंद आहे. येथे काम सुरू असल्याचा सूचना फलकही लावलेला नाही. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway station underground road garbage pollution