बारामती शहरात जोरदार वाऱ्यासह पाऊस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

आकाशात ढग दाटून आले होते, काही काळानंतर जोरदार वारे सुटल्याने अपेक्षित पाऊस काही झाला नाही. मात्र, पावसाचा हलका शिडकावा झाला.

बारामती शहर : शहरात आज सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास पावसाचा हलका शिडकावा झाला. सकाळपासूनच प्रचंड उन्हाने बारामतीकरांची लाहीलाही झाली होती. दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले होते, काही काळानंतर जोरदार वारे सुटल्याने अपेक्षित पाऊस काही झाला नाही. मात्र, पावसाचा हलका शिडकावा झाला.

जोरदार वाऱ्याने सर्व शहरात धुळीचे लोट निर्माण झाले होते. झाडांची पानगळ झाल्याने सर्वत्र पानांचा खच दिसून येत होता. पावसाने हवेत गारवा येण्याऐवजी उकाडा अधिकच वाढला. मात्र, उन्हाची तीव्रता या वातावरणाने कमी झाल्याने लोकांना काहीसा दिलासा मिळाला. धुळीच्या लोटामुळे दुचाकीस्वारांना रस्त्यावरुन वाहन चालविणे अवघड झाल्याचे चित्र संध्याकाळी बारामतीत पाहायला मिळाले. 

Web Title: Rain in Baramati with strong wind