मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पाऊस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

राज्याच्या अनेक भागांत ढगाळ हवामान
पुणे - वरदा चक्रीवादळाच्या प्रभावाने मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूरच्या काही भागांत बुधवारी हलका पाऊस झाला. उद्या (गुरुवारी) दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

राज्याच्या अनेक भागांत ढगाळ हवामान
पुणे - वरदा चक्रीवादळाच्या प्रभावाने मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूरच्या काही भागांत बुधवारी हलका पाऊस झाला. उद्या (गुरुवारी) दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

चक्रीवादळामुळे राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत थंडी कमी झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण, गोव्याच्या काही भागांत, तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे, तर मराठवाड्याच्या संपूर्ण भागात व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

शुक्रवारपासून गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पुण्याच्या परिसरात शुक्रवारी आकाश ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे. शनिवारपासून आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्‍यता असून, थंडी वाढण्याचा अंदाज हवामान सूत्रांनी व्यक्त केला.

वरदा चक्रीवादळ कर्नाटकची किनारपट्टी, केरळपर्यंत सरकले आहे. त्यामुळे उत्तर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, दक्षिण कर्नाटक ते रायलसीमा आणि केरळच्या काही भागांत पाऊस पडला, तर नुमगमबक्कम, वेल्लोर, कावली, नेल्लोर, अनोग्यनरम, धर्मापुरी, मच्छलीपट्टनम, पुद्दुचेरी येथे हलका पाऊस पडला आहे. उत्तर भारतातील अनेक भागांत धुके पडले असून, थंडीमध्ये वाढ झाली होती. येत्या शनिवारपर्यंत उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशातील पश्‍चिमेकडील भागात धुके पडण्याची शक्‍यता आहे.

असे होतील परिणाम
- ज्वारी, हरभऱ्यातील खुरपणीला अडथळा
- पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती
- आजही काही ठिकाणी पावसाचा अंदाज
- द्राक्षांसाठी पाऊस हानिकारक ठरण्याची शक्‍यता

Web Title: rain in central maharashtra & marathwada