झिम्माड भिजण्याचं प्लॅनिंग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जुलै 2016

पुणे - दाटून आलेले ढग... काळवंडलेले आकाश... अन्‌ रिमझिम बरसणारा पाऊस, असे वातावरण म्हटले की प्रत्येकाच्या मनात पहिल्यांदा येणारा विचार म्हणजे भटकंती... पावसात मनसोक्त भिजणे. गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे काही दिवसांपूर्वी केलेले पावसाळी पर्यटनाचे ‘प्लॅन’ आता प्रत्यक्षात येत आहेत. लोणावळा, भुशी डॅम, ॲम्बी व्हॅली, ताम्हिणी घाट येथे दर वर्षीप्रमाणे पर्यटकांची गर्दी होत आहे. ही मजा लुटत असताना हौशी पर्यटकांनी काळजी घेण्याचीही गरज आहे.

पुणे - दाटून आलेले ढग... काळवंडलेले आकाश... अन्‌ रिमझिम बरसणारा पाऊस, असे वातावरण म्हटले की प्रत्येकाच्या मनात पहिल्यांदा येणारा विचार म्हणजे भटकंती... पावसात मनसोक्त भिजणे. गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे काही दिवसांपूर्वी केलेले पावसाळी पर्यटनाचे ‘प्लॅन’ आता प्रत्यक्षात येत आहेत. लोणावळा, भुशी डॅम, ॲम्बी व्हॅली, ताम्हिणी घाट येथे दर वर्षीप्रमाणे पर्यटकांची गर्दी होत आहे. ही मजा लुटत असताना हौशी पर्यटकांनी काळजी घेण्याचीही गरज आहे.

निसर्गाचे पालटले रूप
यंदा राज्यात मॉन्सूनने थोड्या उशिराने हजेरी लावली असली, तरी पावसाच्या अपेक्षेने हौशी पर्यटकांनी पावसाळी सहलीचे नियोजन खूप आधीपासूनच केले आहे. पावसाळ्यात ॲडव्हेंचर्स ट्रेकचा ट्रेंडही पाहायला मिळतो. यासाठी राजगड, रायगड, तोरणा, पुरंदर याचबरोबर रोहिडा, रायरेश्‍वर या किल्ल्यांकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. डोंगर-दऱ्यांमध्ये माथ्यावर खाली आलेले ढग, गवतफुले, बहरलेली हिरवाई. तर घाटपरिसरातील नागमोडी रस्ते व निसर्ग सौंदर्य पाहावयास मिळत आहे.

वाफाळता चहा अन्‌ गरम भजी
वाफाळलेला गरमागरम चहा, फेसाळलेली कॉफी, पिठलं-भाकरी, कांदा-भजी, बटाटा-भजी, वडापाव, उकडलेले अथवा भाजलेले गरमागरम कणीस, मसाला काकडी यांसह शाकाहारी-मांसाहारी जेवणाची अनोखी मेजवानी हे पावसाळी पर्यटनात जमेची बाजू. पर्यटकांसाठी पनीर कबाब, पनीर पॉपकॉर्न, चीज बटर पॉपकॉर्न यांसारखे चविष्ट ‘मेनू’ पर्यटनस्थळांवरील टपऱ्यांवरही मिळू लागले आहेत. अधिकाधिक रोजगार मिळवून देणाऱ्या हा सीझन विक्रेत्यांसाठी फार महत्त्वाचा ठरत आहे.

वॉटरफॉल रॅपलिंग
पावसाळ्यात धबधबे हे पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण असते. पावसाळ्यात पर्यटकांबरोबरच ट्रेकर्सही उत्साहाने घराबाहेर पडले आहेत. ‘वॉटरफॉल रॅपलिंग’ करण्यासाठीदेखील ट्रेकर्स नवनव्या धबधब्यांच्या शोधात आहेत. पावसाळ्यात आव्हानात्मक ठिकाणी ट्रेकिंग फारसे होत नसले, तरी काही साहसी व अनुभवी ट्रेकर्स नवनवीन बेत आखत आहेत. संपूर्ण माहिती असलेल्या गडावर ट्रेकिंगला जातात.

छायाचित्रकारांना पर्वणी
पावसाळ्यात भिजलेल्या निसर्गाचे दृश्‍य कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी हौशी फोटोग्राफर्ससुद्धा तयार झाले आहेत. गडाच्या भटकंतीसह उंचावरून कोसळणारे धबधबे, जलाशये, सर्वत्र फुलून आलेली हिरवाई, धुक्‍याचे वातावरण कॅमेऱ्यात टिपण्यासाठी हौशी छायाचित्रकारांनीही भटकंती करण्याचे नियोजन केले आहे. जलचर, रंगीबेरंगी कीटक, प्राणी, पक्षी, फुले, वेली आशा गोष्टी वाइल्ड लाइफ छायाचित्रकार आवर्जून शोधत असतात.

धम्माल मस्तीसाठी प्लॅन
आई-बाबांनी ठरविलेल्या सहलीत बच्चेकंपनी आणि आजी-आजोबासुद्धा दुणावलेल्या उत्साहाने सहभागी होत आहेत. मग त्याला जोड मिळते ती मित्रपरिवाराची. तरुणांसाठी वीकेंड म्हणजे ‘वन डे रेनी ट्रिप’साठी हक्काचा दिवस ठरत आहे.

पावसाचे आगमन झाल्याने यंदाही भटकंतीचे नियोजन केले आहे. शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशीच सहलीचे प्लॅन करून कुटुंबासह बाहेर पडतो. लोणावळा, खंडाळ्यासह मुळशी, ताम्हिणी, अंबोली, माळशेज घाट आदी ठिकाणांचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी जाणार आहोत. धबधब्यांना पाहण्यासाठी अवश्‍य थांबतो. मक्‍याचे कणीस, भजी आदींचा आस्वाद घेतो.
- सचिन ठोंबरे, पर्यटक

पावसाळी हंगामात ट्रेकिंगपेक्षा पर्यटनाकडेच जास्त कल पाहावयास मिळतो. तरीदेखील सातत्याने ट्रेकिंग करणारे या सीझनमध्ये सुद्धा ट्रेकिंगसाठी बाहेर पडतात. पावसाळ्यात वॉटरफॉल रॅपलिंग करण्यात येते. अवघड ठिकाणी ट्रेंकिगला जाणे टाळले जाते. या वेळी आवश्‍यक ती काळजी संबंधितांनी घ्यावी.
- पिनाकिन कर्वे, संचालक, ‘टेकडी’ 

पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी ‘ऑड डे’लाच आम्ही फोटोग्राफर बाहेर पडतो. पावसाळ्यात निसर्गाचे वेगवेगळे रंग कॅमेऱ्यामध्ये साठविण्यासाठी हा चांगला काळ आहे. गडकिल्ल्यांच्या पायवाटा, नागमोडी रस्ते, जोरदार बरसणारा पाऊस, ढगांचा खेळ यांचे छायाचित्रण आम्ही करतो. पक्षी, कीटक, साप, भातशेती करताना शेतकऱ्यांची दृश्‍ये आम्ही कॅमेऱ्यात टिपतो.
- विवेक गाटे, हौशी छायाचित्रकार

अशी घ्या काळजी
 पर्यटनाला निघताय, जरा काळजी घ्या.
 पर्यटनाला जाण्यापूर्वी त्या ठिकाणाची माहिती कुटुंबीयांसह मित्रमैत्रिणींना द्या. 
 संबंधित पर्यटनस्थळाची संपूर्ण माहिती करून घ्या.
 नकाशा सोबत ठेवा, अथवा गुगल मॅपच्या साह्याने माहिती करून घ्या.
 कार अथवा बाइकवर जाणार असाल, तर वाहनाचे सर्व्हिसिंग करून घ्यावे.
 छत्री, रेनकोट, पावसाळी बूट, टॉर्च, बेसिक फस्टएड बॉक्‍स सोबत ठेवा.
 सामान ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ सॅक जवळ बाळगा.
 शक्‍यतो दिवसा प्रवास करा
 धोक्‍याच्या ठिकाणी सेल्फी अथवा फोटो काढण्याचा मोह टाळावा.

पर्यटनासाठीचे पर्याय...
गड-किल्ले : सिंहगड, राजगड, तोरणा, रोहिडा, रायरेश्‍वर, लोहगड, तुंग-तिकोना, विसापूर
व्हॅलीज्‌ : ॲम्बी व्हॅली, प्लस व्हॅली
धबधबे : मढे घाट, माळशेज घाट, ताम्हिणी घाट, वरंधा घाट, अंबोली
धरणे : पानशेत, मुळशी, पवना, भुशी डॅम
इतर ठिकाणे : लोणावळा, खंडाळा, कामशेत, लवासा, भंडारदरा, माथेरान, खोपोली, कर्जत, भीमाशंकर, कामशेत, कास पठार

Web Title: rain tour planning near pune