Pune Rain Update : रस्ते तुंबले; गटारांच्या स्‍वच्छतेची पोलखोल

पुणे महापालिकेने पावसाळी गटारांची स्वच्छता केली असल्याचा दावा केला असला तरी शनिवारी पहाटे झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे शहर जलमय होऊन प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल झाली.
Pune Rain
Pune Rainsakal

पुणे - महापालिकेने पावसाळी गटारांची स्वच्छता केली असल्याचा दावा केला असला तरी शनिवारी पहाटे झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे शहर जलमय होऊन प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल झाली. हडपसर, नगर रस्ता, कोंढवा, स्वारगेट, कोरेगाव पार्क, बिबवेवाडी, येरवडा यासह भागातील रस्त्यांवर पाणी मोठ्याप्रमाणात तुंबले होते.

पुणे शहर व परिसरात गेल्या महिन्याभरापासून पावसाने उघडीप दिल्याने वातावरणात उकाडा जाणवत होता. मात्र, शनिवारी पहाटे शहरात मध्यम स्‍वरूपाचा पाऊस झाला. महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी स्वतंत्रपणे निविदा काढून पावसाळ्यापूर्वी पावसाळी गटारांची साफसफाई करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केली आहेत.

पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण झाले असले तरी ठेकेदारांकडून पावसाळ्यातही वारंवार गटार आणि चेंबर स्वच्छ करून घेतले जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण प्रत्यक्षात ही कामे व्यवस्थित न झाल्याने मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने शहर जलमय झाले होते.

पहाटे झालेल्या पावसामुळे जेधे चौक स्वारगेट, गुंजन टॉकीज चौक, नॉर्थ मेन रोड, रवीदर्शन चौक लुल्लानगर, मगरपट्टा, भाग्योदयनगर, संविधान चौक घोरपडी, हडपसर इंडस्ट्रिअल एरिया, सिंहगड रस्त्यावर इनामदार चौक, पु. ल. देशपांडे उद्यान, दत्तवाडी चौक, डीपी रस्ता म्हात्रे पूल, राजाराम पूल या भागात पाणी तुंबले होते. बिबवेवाडीचा मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली होता, महेश सोसायटी चौकातही पाणी तुंबले होते.

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे २२ तक्रारी आल्या, यातील बहुतांश तक्रारी या पाणी तुंबल्याच्या होत्या. बिबवेवाडी येथे व्हीआयटी महाविद्यालयाजवळ भिंत पडल्याची तक्रार होती. महापालिकेकडे तक्रारी आल्यानंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी, मलःनिसारण विभागाचे उपअभियंता, बिगारी यांच्यामार्फत पाणी निचरा करण्यासाठी काम सुरू केले. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने रस्त्यावरील पाणी कमी झाले.

चौकांमध्ये गुडघाभर पाणी

शहरात पहाटेपासून सकाळपर्यंत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या भागात अनेक चौकांमध्ये पाणी तुंबले होते. बिबवेवाडीतील महेश सोसायटी चौकाला नदीचे स्वरूप आले होते, रस्त्यावरून जोरदार पाणी वाहत असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली, अनेकांची वाहने बंद पडली. विमाननगर येथे तर चौकाचौकांमध्ये गुडघाभर पाणी तुंबले होते, त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली. तसेच पादचाऱ्यांचेही हाल झाल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहेत.

असमान रस्त्यामुळे पाणी तुंबले

पथ विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविले असल्याचा दावा केला असला ही कामे व्यवस्थित झालेली नाहीत. असमान पातळीतील रस्त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच पावसाळी गटारांच्या झाकणातील कचरा काढला नसल्याने पाणी पावसाळी गटारात न जाता रस्त्यावर तुंबले असल्याचे दिसून आले. राजाराम पुलावर पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने पुलाच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते.

‘शहरात झालेल्या पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे सुमारे २२ तक्रारी आल्या आहेत. यातील बहुतांश तक्रारी या पाणी तुंबल्याच्या होत्या, ज्या भागातून तक्रारी आल्या तेथे क्षेत्रीय कार्यालयाचे पथक पाठवून पाण्याचा निचरा करून दिला. हडपसर, मुंढवा, कोंढवा, येवलेवाडी, कोरेगाव पार्क, नगर रस्ता, स्वारगेट भागातून जास्त तक्रारी होत्या. बिबवेवाडी येथे भिंत पडल्याची एक तक्रार होती.’

- गणेश सोनूने, सहाय्यक आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com