पावसाळ्यापूर्वीच्या कामात घोळ

महेंद्र बडदे
सोमवार, 18 जून 2018

पुणे - महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी कामे केली जातात, त्यात दरवर्षीप्रमाणेच ‘घोळ’ घातला गेला. अतिरिक्त आयुक्तांना अखेर कामे तपासूनच ठेकेदारांच्या बिलाचे पैसे देण्याचे आदेश द्यावे लागले; पण ही कामे तपासण्याचे काम तरी नीट होणार का, की आदेश देऊन अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमतावर पांघरूण घालण्याचा प्रकार होणार ? असा प्रश्‍न आहे.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि गटारे साफ करण्याची कामे केली जातात, असा दावा महापालिका प्रशासन दरवर्षी करते. पहिल्याच पावसात प्रशासनाने केलेला ‘घोळ’ हा गटारे आणि नाले तुंबवितो, असा अनुभव दरवर्षीच पुणेकरांना येतो. यावर्षी महापौर आणि आयुक्तांनी अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वीच्या कामाचे नियोजन करण्यास सांगितले होते. ही कामे पूर्ण झाली आहेत का, याचा आढावा बैठकीत घेतला होता. त्यानंतर ही कामे ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला गेला; परंतु हा दावा खोटा असल्याचे पहिल्या पावसातच स्पष्ट झाले. शहरात अनेक ठिकाणी गटारे आणि नाले तुंबण्याचे प्रकार घडले. 

याकामाविषयी प्रसारमाध्यमांनी शंका उपस्थित केल्याने अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आणि काम तपासूनच संबंधित ठेकेदारांची बिले देण्याचे आदेश दिले. या आदेशाचे पालन होणार की पुन्हा फक्‍त कागद रंगवणार, हा विषय उत्सुकतेचा आहे. गाळ काढण्यात आला होता, परंतु पावसाचा जोर जास्त असल्याने रस्त्यावरील कचरा पुन्हा गटारात गेला, माती आत गेली त्यामुळे गटारे तुंबली, असा युक्तिवाद संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून केला जाऊ शकतो. कोणता नाला तुंबला, कोणत्या भागात सफाई केली, याचा पुरावा पावसाळ्यात कसा गोळा करता येणार, असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. गैरकारभार रोखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच खबरदारी घेणे गरजेचे होते. पुणेकरांच्या करातून मिळालेला पैसा गाळात जाणे त्यांनाच थांबविणे शक्‍य होते.

Web Title: rain before work scam municipal