खडकवासला धरण साखळीत किती पाणीसाठा झाला; वाचा सविस्तर

kj.jpg
kj.jpg

खडकवासला : "धरण साखळीतील चार ही धरणाची मिळून 29.15 टीएमसी उपयुक्त साठवण क्षमता असून त्यापैकी, गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता 15.03 टीएमसी म्हणजे 51.56 टक्के पाणीसाठा जमा झाले आहे." अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

चार ही धरणात मिळून 4 जुलै 2020 रोजी 5 टीएमसी म्हणजे 17.44 टक्के सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक होता. तो महिन्यात 10 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. तर आज गुरुवारी वरसगाव धरणातील लवासा येथील छोटे धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. असे सांगून पाटील म्हणाले, "धरण साखळी क्षेत्रात सोमवारी पावसाला सुरवात झाली. मंगळवारी 24 तास संततधार पाऊस पडला. परिणामी खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ओहोळ- ओढे नाल्यातून बुधवारी संध्याकाळी 10 हजार क्यूसेकचा येवा होता. (म्हणजे 10 हजार क्यूसेक म्हणजे 10 हजार घनफूट प्रतिसेकंद पाणी जमा होत होते.) हा पाणी येण्याचा वेग जास्त असल्याने 14- 15 तासात धरण भरण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाला होता. म्हणून गुरुवारी पाणी सोडण्याची शक्यता वर्तवली होती.

बुधवारी रात्री पावसाचा जोर कमी झाला. परिणामी गुरुवारी सकाळी येवा सहा हजार क्यूसेकपर्यत कमी झाला. गुरुवारी सकाळी पाऊस उघडला होता. परिणामी येवा चार व तीन हजार क्यूसेक असा कमी झाला. गुरुवारी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर तो एक हजार 805 क्यूसेक पर्यत कमी झाला. म्हणजे पाणी साठ्यात होणारी वाढ ही 82 टक्क्यांनी घटली. खडकवासला धरणातून पाणीसाठ्यात पाणी सोडण्याचा निर्णय त्या परिसरात पडणारा पाऊस आणि त्यामुळे येणारे पाणी याच्यावर अवलंबून असतो. असे ही पाटील यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गुरुवारी सकाळी मागील 24 तासात खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणात अनुक्रमे 18, 82, 80 व 85 मिलिमीटर पाऊस पडला. गुरूवारी सकाळी सहा ते गुरूवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे अकरा तासात खडकवासला 12, पानशेत 31 व वरसगाव 37 व टेमघर येथे 45 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. परिणामी, खडकवासला धरणात 1.53 टीएमसी 78 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. कालव्यातून 302 क्यूसेक पाणी सोडले आहे. पाऊस वाढल्यावर तो एक हजार क्यूसेक पर्यत वाढविणार आहे. पानशेत धरणात 6.17 टीएमसी म्हणजे 57.92 टक्के तर वरसगाव मध्ये 6.14 टीएमसी म्हणजे 47.92 टक्के पाणी जमा झाले. तर टेमघर 1.18 टीएमसी म्हणजे 31.95 टक्के पाणी जमा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com