मराठीतील ऐतिहासिक कादंबऱ्या म्हणजे नीचपणाचे लेखन - राजन खान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

कादंबरीचा जन्म 
माझे साडू म्हणाले होते की, तुम्ही कसे काय लिहिता? हा तर ब्राह्मणांचा उद्योग. सगळ्या ब्राह्मणेत्तर समाजाची हीच धारणा आहे. हा बदल पाहणे माझ्यासाठी चांगली गोष्ट ठरली. विसाव्या शतकापर्यंत खेड्याचे जीवन स्थिर होते. त्यांना स्वायत्तता होती; पण १९५० नंतर चित्र बदलले. या बदलातून काही प्रश्न निर्माण झाले त्याच्या उत्तराच्या शोधातून कादंबरीचा जन्म झाला, असे रंगनाथ पठारे यांनी सांगितले.

पुणे - इतिहासकारांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांनी सामाजिक स्थिती बिघडवून टाकली आहे. मराठीत अतिशय नीचपणे लिहिलेले साहित्य आहे ते म्हणजे ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ लेखक राजन खान यांनी खरमरीत टीका केली.

ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारेलिखित ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या महाकादंबरीच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते, लेखक दीपक करंजीकर, रंगनाथ पठारे आणि प्रकाशक सुमती लांडे उपस्थित होत्या.

खान म्हणाले, ‘‘ज्याला विशिष्ट शब्दांचे अर्थही माहिती नाहीत त्यावर लेखक बिनधास्तपणे लिहितात आणि प्रस्तावनेत संबंधित एका विषयावर दहा वर्षांपासून संशोधन करीत आहेत असे लिहितात. त्या ऐतिहासिक कादंबऱ्या इतिहासाच्या नावाखाली ढकोलसा आहेत.’’ 

‘मराठीमध्ये दोनदा वाचावे, असे एकही पुस्तक नाही. एक पुस्तक दोनदा वाचणारे भाबडे असतात. त्यांना वाचन म्हणजे काय किंवा त्याचे मूल्य कळलेले नाही. यातच एक लेखक संपूर्ण वाचावा, असा लेखक नाही. सध्या सलग वाचावा वाटणारा एकमेव लेखक म्हणजे पठारे आहेत. पठारे यांच्या लेखनात थंड रगेलपणा आहे; पण अंत:करणात मृदूपणा जाणवतो.

लेखनातील पात्र जादुई आणि वास्तववादी वाटतात. त्यांची ही परिपूर्ण कादंबरी आहे,’’ असे ते म्हणाले. करंजीकर म्हणाले, ‘‘पुस्तकात चक्रधरपासून काळ सुरू होतो. काळाची मुद्रा मनावर उमटत राहते. हा इतिहास नाही, कादंबरी आहे. त्यात सातशे वर्षांच उत्खनन पठारे करतात. पुस्तकातली भाषा विलक्षण आहे. ’’ गवस म्हणाले, ‘‘पठारे यांचा कादंबरी एका जातीच्या घराण्याचा नव्हे, तर महाराष्ट्रातील मराठा समूह जातीचा शोध आहे. कल्पित आणि वास्तवाचा महाकाय अवकाश त्यांनी कवेत घेतला आहे. ’’रंगनाथ पठारे म्हणाले, ‘‘कांदबरी लिहिताना दडपण आले होते. तीस वर्षे यावर विचार करीत होतो. कादंबरी लिहिताना मनाची संकल्पना बदलत गेली. कादंबरीच्या निर्मितीमूल्याबाबत मी समाधानी आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajan Khan Talking