मोडला कणा, पण सोडला नाही बाणा!

नंदकुमार सुतार 
सोमवार, 23 जानेवारी 2017

अपघातात दोन्ही पाय निकामी झाले असताना मी तुमच्याप्रमाणे जीवन जगत आहे; मला आज कशाचीही कमतरता वाटत नाही. उलट अपघात झाला नसता तर मी केवळ पांढरपेशा नोकरदार असतो, समाजासाठी एवढे मोठे योगदान देऊ शकलो नसतो. प्रेमभंग, परीक्षेतील अपयश, कुरबुरी यामुळे स्वत:चे जीवन संपवायला निघालेल्या तरुणांना म्हणूनच माझे सांगणे आहे की, संकटांकडे इष्टापत्ती म्हणून पाहायला शिका, यश तुमच्यासमोर हात जोडून उभे राहील. - राजकुमार पाटील

पुणे - साऱ्या हालचाली बंद झालेल्या, पाठीवर पडून नजर पत्र्यांच्या आढ्याला, ना कोणाची संगत, भाेसरीतील दहा बाय दहाची खोलीत अशी तीन वर्षे काढली. केवळ आईचा सहारा, ती राबायची अन्‌ संध्याकाळी येऊन पोराला खाऊ घालायची. सारं काही संपलं असताना तीन वर्षांनी थोडे सावरता आले आणि तेथूनच घेतली भरारी, दोन्ही पाय निकामी झालेले असताना.... 

ही जेवढी अविश्‍वसनीय तेवढीच प्रेरणादायी कहाणी आहे राजकुमार पाटील या तरुणाची. साध्या साध्या कारणांसाठी स्वत:च्याच जिवावर उठणाऱ्या तरुण पिढीसाठी. मन खंबीर असेल तर आयुष्यात सर्व काही कधीच संपत नाही; जगण्यासाठी काही तरी आधार सापडतोच हे शिकवणारी. मृत्यूशी कवटाळण्याचा दोन वेळा प्रयत्न करूनही राजकुमारांना नियतीने जगवले आणि त्यातून बोध घेत त्यांनी स्वत:चे नवे आयुष्य उभे केले.

शरीर आणि कुटुंबाने साथ सोडली असतानाही पाटील पुन्हा कसे उभे राहिले, हे जाणून घेण्यासाठी थोडे मागे जाऊया. राजकुमार पाटील मूळचे सोलापूर जिल्ह्यातील नरखेडचे (ता. मोहोळ). पुण्यात ते पदवीचे शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आले होते. विद्यापीठाच्या वसतिगृहात राहत. बी.एड. झाल्यानंतर एका शिक्षण संस्थेत नोकरीही मिळाली. दरम्यान १४ डिसेंबर २००५ रोजी लग्नही झाले. दोघेही भविष्यकाळाची स्वप्ने पाहत नियोजन करत असतानाच २५ मे २००६ रोजी पाटील यांचा भीषण अपघात झाला. गावाकडून दुचाकीवरून परत येत असताना टेंभुर्णीच्या पुढे एका कंटेनरने त्यांना समोरून धडक दिली. उडून ते रस्त्यावर फेकले गेले. मदतीसाठी अनेकांना विनवण्या केल्या; पण तो क्षण येण्यासाठी तब्बल दोन तास रस्त्यावरच पडून राहावे लागले. 

सोलापूरच्या रुग्णालयाने येथे शस्त्रक्रिया शक्‍य नसल्याचे सांगून पुण्याला रवाना केले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पुण्यातल्या रुग्णालयाने एक महिनाभर उपचार करून घरी पाठवून दिले. सोबत सल्ला होताच, ‘फार तर तीन-चार महिन्यांचे सोबती आहेत...’

पाटील सांगतात, ‘‘येथून कमालीच्या हालअपेष्टा सुरू झाल्या. पत्नी गरोदर होती म्हणून त्यांना सासरे घेऊन गेले. आई चार घरी पोळ्या लाटायचे काम करायची. सकाळी जायची आणि संध्याकाळी यायची. मला खाऊ घालायची. त्या छोट्या खोलीत मी तीन वर्षे पत्र्यांकडे पाहत काढले. कारण अजिबात हालचाल करायला जमायचे नाही. कमरेखालचा भाग पूर्णता निकामी, संवेदनाहीन झालेला. त्यात डावा खांदा आणि हातदेखील निष्क्रिय. सगळे शरीरधर्म अंथरुणावरच व्हायचे. कारण मला काही समजायचे नाही. शरीरावर कसलेही नियंत्रण राहिले नव्हते. आई सारे करायची. शी, शू काढण्यापासून रोज अंग पुसून घ्यायची. सातत्याने पाठीवर पडून पाठीला वाटीएवढ्या जखमा झाल्या. आईला चुकवून झोपेच्या गोळ्या आणायला सांगितल्या. दोन वेळा जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण बचावलो. याच स्थितीत मी मुलीचा बाप झाल्याची बातमी कळाली. आता तरी पत्नी येईल आणि मला आधार देईल असे वाटले; पण सासऱ्यांनी तिला पाठवण्यास नकार दिला.’’

या स्थितीत पाटील यांना मदतीचा हात आणि मानसिक आधार दिला तो मित्रांनी. लष्करी रुग्णालयात स्टेमसेल थेरपीने जगण्याची उमेद जागी झाली. शरीरधर्म कधी होतात हे समजू लागले. चिरंजीवी कोणीच नाही, सारे कधी ना कधी मरणारच आहेत; एवढे होऊनही तुला नियतीने जगवले आहे ते काही तरी वेगळे करण्यासाठीच, हा मित्रांचा सल्ला पाटलांनी मनावर घेतला आणि मन खंबीर केले. डबल एम. ए. आणि बी. एड. आहोत, डोके शाबूत आहे, या शिक्षणाचा काही तरी उपयोग करूया, या विचाराने त्याच खोलीत एका विद्यार्थ्याला बोलावून शिकवणी वर्ग सुरू केले आणि नवे आयुष्य सुरू झाले. तेथून त्यांची घोडदौडच सुरू झाली, असे म्हणायला हरकत नाही. कारण २०१२ मध्ये श्रेया मल्टिपर्पज संस्था सुरू केली आणि २०१५मध्ये डॉ. एस. बी. इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केले. त्याची दुसरी ब्रॅंच दिघीमध्येही सुरू झाली आहे. पंधरा कर्मचारी संस्थेत काम करू लागले. दरम्यानच्या काळात सासऱ्यांनी पाटील यांच्या पत्नीला पाठवून दिले. त्यांनी संस्थेच्या प्रशासनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. दोघांचा संसार पुन्हा छान सुरू झाला आहे. संस्थेचा मोडून पडलेल्या आयुष्याने गती घेतली आहे.

दुसऱ्यावरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी पाटील यांनी इलेक्‍ट्रिक व्हीलचेअर घेतली, एक कारही घेतली. पायातील कंट्रोल वर हातामध्ये आणण्यासाठी कारमध्ये बदल करून घेतला. ते स्वत: गाडी चालवतात, गोवा-गुजरात या राज्यांमध्ये स्वत: गाडी चालवत प्रवास केला आहे.

हेल्मेट होते म्हणून
अपघातानंतर पाटील यांचा कमरेखालचा भाग निकामी झाला. मात्र हेल्मेट घातल्यामुळे डोक्‍याला कसलीही इजा झाली नाही. डोके शाबूत राहिल्यामुळेच आज ते स्वत:चे नवे विश्‍व निर्माण करू शकले.

शाळेला मित्राचे नाव
पाटील यांनी सुरू केलेल्या शाळेला त्यांचे परममित्र ठाणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. संदीप भाजीभाकरे यांचे नाव दिले आहे. संकटाच्या काळात पाटील यांना त्यांची खूप मदत झाली. मित्रत्वाच्या नात्याला असे स्वरूप देऊन पाटील यांनी सर्वांसमोर आदर्शच ठेवला आहे.

अपघातात दोन्ही पाय निकामी झाले असताना मी तुमच्याप्रमाणे जीवन जगत आहे; मला आज कशाचीही कमतरता वाटत नाही. उलट अपघात झाला नसता तर मी केवळ पांढरपेशा नोकरदार असतो, समाजासाठी एवढे मोठे योगदान देऊ शकलो नसतो. प्रेमभंग, परीक्षेतील अपयश, कुरबुरी यामुळे स्वत:चे जीवन संपवायला निघालेल्या तरुणांना म्हणूनच माझे सांगणे आहे की, संकटांकडे इष्टापत्ती म्हणून पाहायला शिका, यश तुमच्यासमोर हात जोडून उभे राहील. - राजकुमार पाटील

Web Title: Rajkumar patil inspirational story