
२२ डिसेंबरला वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीतील रिलायन्सच्या ऑफिसपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.
Farmers Protest: पुणे : देशातील काही बड्या उद्योगपतींच्या फायद्यासाठीच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नवे कृषी कायदे केले आहेत. या कायद्यांचा लाभ शेतकऱ्यांना नव्हे, तर मुकेश अंबानी यांच्यासारख्या मोठ्या उद्योगपतींना होणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी (ता.१६) पुण्यात पत्रकार परिषदेत केला.
केंद्र सरकारच्या या कायद्यांना विरोध करण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील रिलायन्स कंपनीच्या कार्यालयावर येत्या २२ डिसेंबर रोजी धडक मोर्चा काढणार असल्याचे शेट्टी यांनी यावेळी जाहीर केले.
- पुण्यात गुन्हेगारांची झाडाझडती; 'कोम्बिंग ऑपरेशन'द्वारे ५५ जणांना अटक
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. शेट्टी म्हणाले, "२२ डिसेंबरला वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीतील रिलायन्सच्या ऑफिसपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. यात राज्य मंत्रिमंडळातील राज्यमंत्री बच्चू कडू आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव देखील सहभागी होणार आहेत."
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे.
- Corona Updates: काय सांगता! पुण्यातील १०५ वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनाला हरवलं
शेतकरी संघटनांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
''सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना नोटीसा बजावल्या आहेत. रस्ता रोखणाऱ्यांची नावे मागवली आहेत. केंद्र सरकारला जर शेतकऱ्यांना खरंच काही द्यायचं असेल, तर हमीभाव द्या. उगाच त्यांच्यावर नको असलेले कायदे लादू नका", अशी मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली. यासोबतच मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी संघटनाही एकत्र आल्या असल्याचं त्यांनी सांगितले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)