दानवेंना शेतकरी कधीही माफ करणार नाही : राजू शेट्टी

यशपाल सोनकांबळे
शनिवार, 13 मे 2017

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून "आत्मक्‍लेष यात्रा' काढण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यमंत्री सदाभाऊ खोत सहभागी होणार का ? या प्रश्नावर खासदार शेट्टी म्हणाले की, "त्यांची तब्येत बरी नाही, म्हणून ते येणार नाहीत,' असे सांगत त्यांनी सदाभाऊ विषयी अधिक बोलणे टाळले.

पुणे : "तूरडाळ खरेदी केली तरी रडतात साले,' हे विधान सत्तेमध्ये रममाण झाल्याने रावसाहेब दानवे यांनी केले असून सत्तेत गेल्यानंतर माणसात किती बदल होतो, हे त्यांना पाहिल्यावर दिसून येते. हे विधान निषेधार्ह असून त्यांना शेतकरी कधीही माफ करणार नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी केली. 

शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार शेट्टी म्हणाले, "दानवे हे तळागळातून आलेले नेते आहेत. त्यांना शेतीविषयी माहिती असून त्यांनी केलेले विधान निषेधार्थ आहे. शेती राज्याचा विषय आहे, असे सांगून ही जबाबदारी केंद्र सरकार टाळू शकत नाही. दोन्ही सरकार तूरडाळीबाबत कोणताही ठोस निर्णय घेताना दिसत नाही. तूरखरेदीमध्ये गैरव्यवहार होत असून शेतकऱ्यांना तुरीसाठी 15 दिवसापासून रांगेत उभे राहावे लागत आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी लवकरच चर्चा करणार आहे. परंतु शेतकऱ्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राजकीय दबावापेक्षा सामाजिक दबावाची गरज आहे.

"एका बाजूला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नाही. तर दुसरीकडे विजय मल्ल्या हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून मज्जा मारतोय, हे काय चालू आहे. त्याच्याकडून हे सरकार मात्र कर्जवसुली करत नाही,'' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

सदाभाऊंची तब्येत ठीक नाही : खासदार शेट्टी 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून "आत्मक्‍लेष यात्रा' काढण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यमंत्री सदाभाऊ खोत सहभागी होणार का ? या प्रश्नावर खासदार शेट्टी म्हणाले की, "त्यांची तब्येत बरी नाही, म्हणून ते येणार नाहीत,' असे सांगत त्यांनी सदाभाऊ विषयी अधिक बोलणे टाळले.

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आत्मक्‍लेष यात्रा ! 
"शेतकऱ्यांच्या सात बारा कोरा करा, संपूर्ण कर्जमाफी करावी तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना 22 ते 30 मे दरम्यान "आत्मक्‍लेष यात्रा' काढणार आहे. पुण्याच्या महात्मा फुले वाड्यापासून या यात्रेला सुरवात होईल. तर मुंबईतील "राजभवन' येथे यात्रेचा समारोप केला जाईल. "एक दिवस शेतकऱ्यांना' देत सर्वसामान्य नागरिकांनी देखील या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी केले.

Web Title: Raju Shetty takes a dig at BJP State President Raosaheb Danve