विद्यार्थिनींनी बांधल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या

प्रफुल्ल भंडारी
रविवार, 26 ऑगस्ट 2018

दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना शहरातील सेंट सेबॅस्टियन विद्यालयातील विद्यार्थिनी व शिक्षिकांनी राख्या बांधून राखी पौर्णिमा उत्साहात साजरी केली.

दौंड (पुणे): दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना शहरातील सेंट सेबॅस्टियन विद्यालयातील विद्यार्थिनी व शिक्षिकांनी राख्या बांधून राखी पौर्णिमा उत्साहात साजरी केली.

सेंट सेबॅस्टियन विद्यालयाचे प्राचार्य रेव्हरंड डेनिस जोसेफ, पर्यवेक्षक नितीन शिरसाठ, पर्यवेक्षिका ज्यूडी विलियम्स व शिक्षक वर्गाच्या संकल्पनेतून आज (ता. 26) सकाळी राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाच येथील मंगलमूर्ती सभागृह येथे हा राखी पौर्णिमेचा सोहळा पार पडला. नितीन शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले.

रेव्हरंड डेनिस जोसेफ म्हणाले की, पोलिस हे सर्वांची रक्षा करण्यासह समाज एकसंध करण्याचे राष्ट्रकार्य करीत आहेत. घरदार सोडून चोवीस तास जनतेची सेवा करणारे पोलिस अभिनंदनास पात्र आहेत. आज संत मदर तेरेसा यांची जयंती असून विद्यार्थिनी व शिक्षिकांकडून पोलिस बांधवांना राख्या बांधून खर्या अर्थाने मानवतेची व परंपरेची जपणूक केली जात आहे.

विद्यालयाच्या एकूण 70 विद्यार्थिनी आणि विद्यालयातील शिक्षिकांनी पारंपरिक पध्दतीने ओवाळून राख्या बांधल्या. शिक्षिका मर्लिन फिलीप, रईसा शेख, मुनिरा सय्यद यांच्यासह शरद वाळके व विजय ओहोळ हे शिक्षक या वेळी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक बी. जी. कोळी, पोलिस कल्याण अधिकारी सचिन डहाळे, उप निरीक्षक एस.एम. सरोदे यांनी स्वागत करून हा सोहळा आयोजित केल्याबद्दल विद्यालय प्रशासनाचे कौतुक केले.

पोलिसांनाही यावेळी गहिवरुन आले...
नोकरीमुळे रजा घेऊन ज्यांना आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेता आली नाही असे राज्य राखीव पोलिस दलाचे अधिकारी व कर्मचारी यांना राख्या बांधल्या जात असताना त्यांचे डोळे पाणावले. विद्यार्थिनी राख्या बांधत असताना कर्तव्यात कठोर असणारे राज्य राखीव पोलिस दलाचे अधिकारी व कर्मचारी मात्र स्वकीयांच्या आठवणींनी गहिवरले.

Web Title: raksha bandhan celebrated in daund student with police officers