आता पुन्हा पुतळा उभारू नका 

आता पुन्हा पुतळा उभारू नका 

पुणे - लेखक-कलावंताचे पुतळे आता पुन्हा उभारू नका, म्हणजे पुन्हा कोणाची बदनामी होणार नाही. लेखक-कलावंत हे पुतळे उभारल्याने जिवंत राहत नाहीत. ते आपल्या कलाकृतींतूनच अजरामर होत असतात, अशा भावना व्यक्त करून नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवल्याच्या घटनेचा लेखक-कलावंतांनी एकत्र येऊन मंगळवारी निषेध केला. संभाजी उद्यानात गडकरींचा पुतळा पुन्हा बसवू नका, अशी मागणीही त्यांनी केली. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पुणे आणि कोथरूड शाखा), महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने संभाजी उद्यानाच्या आवारात एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला. या वेळी श्रीनिवास भणगे, किरण यज्ञोपवीत, डॉ. सतीश देसाई, प्रा. मिलिंद जोशी, प्रसाद ओक, योगेश सोमण, श्रीराम रानडे, सुरेश देशमुख, सुनील महाजन, प्रवीण तरडे, दीपक रेगे, प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार, रवी मुकुल, मकरंद टिल्लू, मेघराजराजे भोसले, निकिता मोघे, रजनी भट, उद्धव कानडे यांच्यासह इतर लेखक-कलावंत आणि संस्थांतील पदाधिकारी उपस्थित होते. 

भणगे म्हणाले, ""राज्यात जितके पुतळे आहेत ते सरकारने काढावेत. आम्हाला पुतळ्यांची गरज नाही. गडकरी खूप मोठे होते. त्यांचे कार्य आम्ही कलाकृतींतून लोकांपर्यंत पोचवत राहू.'' तरडे म्हणाले, ""गडकरींच्या नाटकामुळे नाटककारांच्या अनेक पिढ्या घडल्या. अशा व्यक्तीचा पुतळा बुद्धिवंतांच्या शहरातून अशाप्रकारे गायब होतो, हा प्रकार निंदनीय आहे.'' यज्ञोपवीत म्हणाले, ""निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडला आहे. खरंतर ही विचारहीन कृती आहे. यामुळे कोणाला राजकीय फायदा होईल, असे नाही. जनता योग्य ते उत्तर देईल.'' 

नाटककार राम गणेश गडकरी यांनी अनेक कलावंतांना घडवले. अशा आद्यप्रवर्तक मानल्या जाणाऱ्या नाटककाराचा पुतळा काढणे म्हणजे घृणास्पदच प्रकार आहे. हा एका व्यक्तीचा नव्हे, तर रंगभूमीचाच अपमान आहे. 
- प्रसाद ओक, अभिनेता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com