esakal | 'गारवा' हॉटेल मालकाची हत्येची 'सुपारी'; कटाचा उलगडा
sakal

बोलून बातमी शोधा

ramdas aakhade

'गारवा' हॉटेल मालकाची हत्येची 'सुपारी'; कटाचा उलगडा

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे - सकाळ वृत्तसेवा

पुणे : गारवा हॉटेलमुळे शेजारच्या अशोका हॉटेलचा व्यवसाय होत नव्हता. त्यामुळे अशोकाच्या मालकांनी सर्राइत गुन्हेगार भाच्याला सुपारी देवून रामदास आखाडे यांचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय ५६), निखिल बाळासाहेब खेडेकर (वय २४), सौरभ ऊर्फ चिम्या कैलास चौधरी (वय २१), अक्षय अविनाश दाभाडे (वय २७) करण विजय खडसे (वय २१), प्रथमेश राजेंद्र कोलते (वय २३), गणेश मधुकर साने (वय २०) आणि निखिल मंगेश चौधरी (वय २०, सर्व रा. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रामदास रघुनाथ आखाडे (वय ३८, रा. दौंड) असे मृत्यू झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे.

हेही वाचा: खडकवासला धरणातून होणार विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

बाळासाहेब खेडेकर व त्याचा मुलगा निखिल यांचे आखाडे यांच्या गारवा हॉटेल शेजारी अशोका नावाचे हॉटेल आहे. आखाडे यांच्या हॉटेलमुळे खेडेकर यांच्या हॉटेलचा व्यवसाय होत नव्हता. त्यामुळे बाळासाहेब खेडेकर याने त्याचा भाचा सौरभ चौधरी याला आखाडे याचा खून करण्यास सांगितले. ''आखाडे यांचा खून केल्यास तुला दररोज एक ते दोन हजार रुपये देवू'' असे खुनाच्या दोन महिने आधी खेडेकर बाप-लेकाने चौधरी याला सांगितले होते. त्यानुसार चौधरी याने त्याचा साथीदार नीलेश मधुकर आरते व इतर साथीदारांच्या मदतीने आखाडे यांचा खून केल्याची माहिती गुरुवारी (ता. २२) सरकारी वकील संजय दीक्षित यांनी न्यायालयास दिली. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींनी १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी अॅड. दीक्षित यांनी केली. न्यायालयाने आरोपींना २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक दादाराजे पवार या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

हेही वाचा: पाणी पुरवठा निविदेतील ‘जादू’ची महापालिका वर्तुळात चर्चा

तर अशोकाचा तीन लाखांचा व्यवसाय होत :

गारवाचा रोजचा गल्ला दोन ते अडीच लाख रुपये तर अशोकाचा साधारण ५० ते ६० हजार रुपये होत. गारवा बंद असते त्या दिवशी अशोकाचा व्यवसाय अडीच ते तीन लाख रुपयांचा होता. त्यामुळे गारवा कायमचे बंद पडले तर आपला व्यवसाय वाढेल या विचाराने आरोपींनी खुनाचा कट केल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.

loading image