आठवले यांचा माफीनामा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अनादर करण्याचा माझा हेतू नव्हता. आजच्या तरुणाईबद्दल भाष्य करण्यासाठी केलेल्या विडंबनात्मक काव्याचा विपर्यास करून काही मंडळींनी मातंग आणि बौद्ध समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तरीही अनवधानाने केलेल्या माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो,’’ अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी माफी मागितली.

पुणे - ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अनादर करण्याचा माझा हेतू नव्हता. आजच्या तरुणाईबद्दल भाष्य करण्यासाठी केलेल्या विडंबनात्मक काव्याचा विपर्यास करून काही मंडळींनी मातंग आणि बौद्ध समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तरीही अनवधानाने केलेल्या माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो,’’ अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी माफी मागितली.

आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला पिंपरीची जागा देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. पिंपरीची जागा रिपब्लिकन पक्षाला मिळू नये, यासाठीच काही धर्मांध शक्तींनी माझ्या वाक्‍याचा विपर्यास केला. सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या मजकुरावर मातंग आणि बौद्ध समाजाने अवलंबून न राहता सामाजिक एकोपा जपावा, असे आवाहनही त्यांनी केले.

अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पिंपरी-चिंचवडच्या कार्यक्रमात आठवले यांच्याकडून अण्णा भाऊ साठे यांचा अनादर झाल्याचे सोशल मीडियावर पसरले होते. त्यानंतर आठवले यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. मात्र, सोशल मीडियावर आठवले यांचा निषेध सुरूच होता. 

या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी आठवले यांनी मातंग समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी माफी मागून वादावर पडदा टाकला. आठवले म्हणाले, ‘‘अण्णा भाऊ साठे यांच्याबद्दल नेहमीच आदर आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांना भारतरत्न मिळावा, यासाठी संसदेत मागणी करणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Athawale apology Politics