...पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

Without-Mask
Without-Mask

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत गेल्याने, हा आजार जणू हद्दपार झाला आहे, असा समज अनेकांनी करून घेतला होता. त्यामुळे त्यांच्याकडून वैयक्तिक आणि सार्वजनिक व्यवहारांतही आरोग्यविषयक नियमांकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. या बेफिकिरीचा परिणाम म्हणजे, एखादा चेंडू खाली पडल्यावर पुन्हा उसळी घेतो, त्याप्रमाणे ‘कोरोना’ने पुन्हा डोके वर काढले आहे. 

बेशिस्तीचा अतिरेक
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या काही महिन्यांपूर्वी देशात सर्वाधिक होती. सर्व पातळ्यांवर योजण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे तीत लक्षणीय घट झाली होती; पण सार्वजनिक बेशिस्त आणि त्याकडे पोलिस, तसेच अन्य प्रशासकीय यंत्रणेने केलेला काणाडोळा, यांमुळे ‘पहिले पाढे पंचावन्न’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. वसंतपंचमी आणि अन्य मुहूर्त साधत थाटामाटात, पाहुण्या-रावळ्यांच्या भरगच्च उपस्थितीत उडविले गेलेले लग्नाचे बार, राज्यभरात चुरशीने झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका, ‘व्हॅलेंटाइन्स डे’ साजरा करताना तरुणाईने दाखविलेला अतिउत्साह आणि त्याजोडीला थंडीमुळे घसरलेले तापमान, या सगळ्यांचा परिपाक बाधितांची संख्या वाढण्यात झाला, असे सांगितले जाते. यांपैकी थंडी हे नैसर्गिक कारण आहे. मात्र, इतर बाबींना लोकांच्याच चुका कारणीभूत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टाळेबंदी अजूनही लागू
‘कोरोना’ला अटकाव करण्यासाठी पहिला लॉकडाउन गेल्या वर्षी मार्चमध्ये जाहीर झाला. लक्षात घेण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही टाळेबंदी अद्यापही सगळीकडे लागू आहे. सुरुवातीला तिचे स्वरूप कडक होते. अत्यावश्यक कामांखेरीज घराबाहेर पडायला परवानगी नव्हती. आता हे निर्बंध शिथिल झाले आहेत- मागे घेतलेले नाहीत. तथापि, नियमांना मुरड घालणाऱ्यांच्या ते गावीही नाही. बाहेर वावरताना इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे आणि मास्क वापरणे, हे अगदी प्राथमिक पथ्य. त्याकडे किती दुर्लक्ष होत आहे, हे रस्त्यांवरील, बाजारातील गर्दीत ठळकपणे दिसते. या पार्श्वभूमीवर, संबंधितांच्या वैयक्तिक स्वच्छतेबद्दल तर बोलायलाच नको!

अस्थानी सहानुभूती
या बेशिस्तांची संख्या प्रचंड आहे. लॉकडाउनमध्ये नियमभंग केल्याबद्दल मध्यंतरी पुण्यातील सुमारे तीस हजार जणांना भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १८८ नुसार नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यावर या ‘जागरूक’ मंडळींनी पोलिसांनाच धारेवर धरले. ‘तुम्हाला काही काम-धंदा आहे की नाही? चोर, दरोडेखोरांना पकडायचे सोडून आमच्या मागे का लागला आहात,’ असा सात्विक संताप त्यांनी व्यक्त केला. ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’ असा हा प्रकार! पण पुण्याच्या पोलिस आयुक्तांना त्यांचा उमाळा आला आणि त्यांनी कारवाई थांबविण्याची सूचना केली. ‘लोकांनी लॉकडाउनमध्ये एवढे काही सोसले आहे, की त्यांना आता हा त्रास का द्यायचा,’ अशी मवाळ भूमिका त्यांनी घेतली. हे दया-क्षमा-शांतीचे धोरण आता अंगलट आले आहे.

कारवाईत सातत्य हवे
मास्क न वापरल्याच्या कारणावरून पुणे जिल्ह्यात आतापर्यंत २१ कोटी २४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोटींत दंड भरू; पण सुधारणार नाही, अशी मनोवृत्ती असलेल्यांबद्दल कसलीही सहानुभूती बाळगण्यात अर्थ नाही. आपल्या बेजबाबदार वागण्याने ते स्वतः तर धोक्याच्या सावटाखाली येतातच, त्याजोडीला आपल्या कुटुंबीयांना आणि इतर नागरिकांनाही संकटात ढकलतात. त्यांच्यासंदर्भात अधून मधून नव्हे, तर सातत्याने कडकच धोरण ठेवले पाहिजे. तसे झाले असते, तर त्यांना आणि इतरांनाही योग्य धडा मिळाला असता आणि ‘कोरोना’ची उद्रेकसदृश परिस्थिती कदाचित पुन्हा निर्माण झाली नसती. 

कडक लॉकडाउनचा इशारा
आता हा विषय गळ्याशी येतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर, प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. ‘लोकांनी शिस्त पाळावी, अन्यथा पुन्हा कडक लॉकडाउन लागू करावा लागेल,’ असा इशारा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिला आहे. काही ठिकाणी त्या दिशेने पावले उचलायलाही सुरूवात झाली आहे. अमरावती, अकोला, यवतमाळमध्ये जमाबबंदी लागू झाली असून, पुणेकरांनी या संकटाची दखल गांभीर्याने घेतली नाही, तर हे लोण येथपर्यंत पोचू शकते. टाळेबंदीत नोकरी-व्यवसाय सोडून घरी बसून राहावे लागणे कसे असते, याचा दाहक अनुभव सर्वांनी घेतला आहे. त्यामुळे ती वेळ यापुढे येणार नाही, याची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. अन्यथा, समाजहिताचे नियम धुडकावणे, म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ असे आवतणे दिल्यासारखे होईल!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com