आनंदाचे डोही आनंद तरंग..!

Happy Man
Happy Man

महाराष्ट्रातील अन्य कोणत्याही शहराच्या तुलनेत पुण्यातील नागरिक सर्वाधिक आनंदी आहेत, असा निष्कर्ष हरियानातील एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात निघाला आहे. यात पुण्याने राज्यात अग्रस्थानी राहताना देशपातळीवर बारावा क्रमांक मिळविला आहे. हे शहर निवासासाठी देशात सर्वोत्कृष्ट असल्याचा निर्वाळा अन्य एका सर्वेक्षणाने याआधीच दिला आहे. त्यापाठोपाठ या नवीन अभ्यासाने पुण्यनगरीच्या महतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. ही बाब पुण्याशी संबंधित सर्वांनाच सुखावणारी आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तिन्ही ‘राजधान्या’ आनंदी!
गुरुग्राम येथील ‘मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’चे प्रा. राजेश पिल्लानिया यांच्या नेतृत्वाखाली हे सर्वेक्षण झाले. त्यांच्या चमूने देशातील ३४ शहरांतील सुमारे १३ हजार नागरिकांशी बातचीत केली आणि त्यातून हे निष्कर्ष काढले आहेत. त्यात महाराष्ट्रात पुण्याखेरीज फक्त नागपूर आणि मुंबई या शहरांनी देशस्तरावर अनुक्रमे सतरावा आणि एकविसावा क्रमांक मिळविला आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, नागपूर उपराजधानी, तर पुणे ही सांस्कृतिक राजधानी - थोडक्‍यात, राज्यातील या तिन्ही ‘राजधान्या’ नागरिकांना अन्यांच्या तुलनेत आनंदी ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत.

अनेकविध वैशिष्ट्ये
शिक्षण, आरोग्य सेवा, नोकरीच्या संधी, सुरक्षितता, खुले सामाजिक वातावरण, अत्याधुनिक सुविधा अशा अनेकविध कारणांमुळे पुणे शहर देशभरात नावाजले जाते. यांखेरीज येथील हवामान, पाण्याची उपलब्धता, दळणवळणाचे जाळे आदी बाबी उच्च दर्जाच्या असल्याने ‘पुणेकर’ होण्याची इच्छा बाहेरगावांतील अनेकांना असते. कित्येक वरिष्ठ सरकारी अधिकारी, कर्मचारी निवृत्तीनंतर त्यांच्या मूळ गावांऐवजी पुण्यात स्थायिक होणे पसंत करतात. त्यांत सर्व आर्थिक स्तरांतील व्यक्तींचा समावेश आहे.

राज्याच्या व देशाच्या विविध भागांतून हजारो लोक पुण्यात येऊन स्थिरावल्यामुळे या शहराचा मूळचा तोंडवळा बदलला आहे. ‘अस्सल पुणेकर’ असा काही पिढ्यांचा वारसा सांगणाऱ्या मंडळींपेक्षा त्यांची संख्या खचितच वाढत चालली आहे. मध्य वस्तीतील पेठा, डेक्कन जिमखाना, कोथरूड व विस्तारलेली अन्य उपनगरे ते आधुनिक जीवनशैलीचे पदोपदी दर्शन घडविणारा कोरेगाव पार्कसारखा परिसर.. प्रत्येक ठिकाणची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये आहेत. त्या सगळ्यांचे प्रतिबिंब आहारा-विहारापासून शहराच्या सर्व प्रकारच्या संस्कृतीत पडले आहे.

प्रतिकूलतेवर मात
वैयक्तिक, तसेच सार्वजनिक पातळीवर भौतिक सुखसुविधा कशा आणि किती उपलब्ध आहेत, यावर अनेकांचे सौख्य अवलंबून असते; परंतु ‘आनंदी राहणे’ ही एक मानसिकताही असते. ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ असे संतवचन आहे.

त्यानुसार, एकीकडे स्वतःचा उत्कर्ष साधण्याचा प्रवास सुरू असताना, आपले उद्दिष्ट साध्य होईपर्यंत वर्तमानातील सर्वसाधारण वा विपरीत परिस्थितीतही आनंदी जगण्याची कला काहींना साध्य असते. पुण्यासंबंधीच्या ताज्या सर्वेक्षणात तसा काही अनुभव आला आहे किंवा कसे, याचा तपशील उपलब्ध नाही. तथापि, या पाहणीचे वैशिष्ट्य म्हणजे ‘कोरोना’ने दैनंदिन जीवनावर मोठा आघात केलेला असताना हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

पुण्याला सर्वाधिक फटका
‘कोरोना’च्या आक्रमणामुळे गेल्या वर्षी मार्चनंतरचे किमान पाच-सहा महिने सगळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. अनेकांचे रोजगार-व्यवसाय बुडाले. आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक असे एकही क्षेत्र यातून बचावले नाही. त्यातून वैयक्तिक पातळीवर केवळ आर्थिक, शारीरिक नव्हे, तर मानसिक समस्याही निर्माण झाल्या. सर्व प्रकारचे स्वास्थ्य संपुष्टात आले; परंतु त्याही अपसाधारण परिस्थितीवर मात करण्याची विजिगीषू वृत्ती पुणेकरांत दिसली. ‘कोरोना’चा फैलाव तसा सगळीकडेच झाला असला, तरी देशात त्याचा सर्वाधिक संसर्ग पुण्यात झाला होता. त्यामुळे येथील प्रतिबंधित क्षेत्रांची (कंटेन्मेंट झोनची) संख्या लक्षणीय होती. (आज ती शून्यावर आली आहे!) अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभूतपूर्व संकटांशी मुकाबला सुरू असतानाही, आपण आनंदी असल्याचे पुणेकर सांगत असतील, तर त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनाला दाद दिलीच पाहिजे. 
सलाम पुणेकर!...

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com