बापलेकाच्या भेटीने ईद अविस्मरणीय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

पुणे - बुलडाण्यातील जल पिंपळगाव या गावातून नजीर पठाण हा मनोरुग्ण तरुण दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली; पण त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर "स्माइल प्लस फाउंडेशन'चे योगेश मालखरे यांनी त्याची आणि त्याच्या वडिलांची भेट घडवून आणली. ईदच्या पूर्वसंध्येला नजीर आणि त्याच्या वडिलांची भेट झाली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनात ईद साजरी झाली.

मालखरे यांना औरगांबादमध्ये रस्त्यावर नजीर दयनीय अवस्थेत सापडला. मालखरे यांनी त्याला अंघोळ घातली. जेवण दिले. नवीन कपडे घातले. त्यानंतर त्यांनी त्याला पुण्यात आणले. पोलिस तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी नजीरला येरवड्यातील मनोरुग्णालयात दाखल केले. नजीरला मनोरुग्णालयात उपचार मिळू लागले.

दरम्यान, मालखरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून नजीरची कहाणी "सोशल मीडिया'वर शेअर केली. हा व्हिडिओ हजारोंवर शेअर झाला. बुलडाण्यातील देऊळगावमधील मुजिम या तरुणाने नजीरला ओळखले आणि ही माहिती नजीरच्या नातेवाइकांना कळविली. त्यांनतर काल (ता. 14) नजीरचे वडील अहमद पठाण पुण्यात आले. त्यांनी मालखरे यांना धन्यवाद देत आज नजीरला मनोरुग्णालयातून ईदसाठी चार दिवस सुटी काढून घेऊन गेले.

बेवारस मनोरुग्णांना मदत केली पाहिजे. त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. मात्र, मनोरुग्णालयात या रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया बरीच वेळखाऊ आणि किचकट आहे, अशा रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध नसतात. या अडचणी शासनाने सोडवल्या पाहिजेत.
- योगेश मालखरे, सामाजिक कार्यकर्ते

माझा मुलगा सापडल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. योगेश मालखरे यांनी ईदनिमित्त आमच्या कुटुंबाला ही अनमोल भेट दिली आहे. आमचा मुलगा सुखरूप परत मिळाला ही खूप आनंदाची गोष्ट आहे.
- अहमद पठाण, नजीरचे वडील

Web Title: ramjan ied ahmad pathan najir pathan yogesh malkhare