रांजणगाव देवस्थानचा कारभार ढासळला...

भरत पचंगे
सोमवार, 2 जुलै 2018

अपात्र व्यवस्थापकांमुळे कामगार संतप्त तर स्वच्छतागृहांचीही दुरावस्था

अपात्र व्यवस्थापकांमुळे कामगार संतप्त तर स्वच्छतागृहांचीही दुरावस्था

शिक्रापूर (पुणे): संपूर्ण राज्याचे श्रध्दास्थान असलेल्या रांजणगाव-गणपती देवस्थानमध्ये व्यवस्थापक पदासाठी पात्र उमेदवार दिला नसल्याने देवस्थानचा कारभार पूर्ण ढासळलेला आहे. सध्याचे व्यवस्थापकांबाबत अनेक तक्रारी असूनही आणि पूर्वीच्या विश्वस्तांनी एकदा निलंबनाची कारवाई करुनही व्यवस्थापकांना पाठीशी घालण्याचा उद्योग देवस्थानमध्ये सुरू आहे. याचा परिणाम मंदिराच्या उत्पन्न घटीवर झाला असून,  स्वच्छतागृहांसारखे अनेक प्रश्नही गंभीर होत चालले आहेत. याबाबत धर्मादाय आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी कर्मचाऱ्यांच्या भारतीय मजदूर संघटनेच्या वतीने करण्यात आली.

संपूर्ण राज्याचे श्रध्दास्थान असलेल्या रांजणगाव देवस्थानमध्ये गेल्या तीन वर्षात उप्तन्न घटीबरोबरच देवस्थान परिसर अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याबाबत मंदिरात कार्यरत जिल्हा मजदूर संघाच्या कामगार संघटनेने धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. यात सर्वात मोठा आक्षेप देवस्थानचे व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे यांच्याबाबत आहे. गोऱ्हे यांच्या गैरवर्तनावरुन यापूर्वीच्या विश्वस्तांकडून एकदा त्यांचेवर निलंबनाचीही कारवाई झालेली असताना ते पुन्हा देवस्थानमध्ये व्यवस्थापकपदी कार्यरत आहेत. त्यामुळेच देवस्थानच्या उत्पन्न घटण्याबरोबरच परिसर अस्वच्छतेच्या तक्रारी भाविकांकडून व्यक्त होत आहेत. या शिवाय मंदिरात व्यवस्थापक हा उच्चशिक्षित व स्वच्छ चारीत्र्याचा असावा, अशी भाविकांची मागणी असताना गोऱ्हे हेच पात्र होतील अशाच पात्रतेच्या जाहिराती वृत्तपत्रात प्रसिध्द करुन त्यांना सेवेत ठेवण्यात विश्वस्तांचे आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोपही कामगार संघटनेचे वतीने करण्यात आलेला आहे.

याबाबत कामगार आणि विश्वस्त यांच्यामध्ये केवळ व्यवस्थापकाच्या मुद्द्यावरुन वाद असणे आणि व्यवस्थापकात क्षमता नसल्याने मंदिर परिसरातील स्वच्छता गृहांची दूरावस्था आणि उत्पन्न घट होत असल्याचे कारण पुढे करीत संघटनेचे वतीने धर्मादाय आयुक्तांना याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास उपोषण आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसे पत्र कर्मचारी संघटनेचे वतीने संघटनेचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ यांनी धर्मादाय आयुक्तांना दिलेले आहे. या शिवाय गेल्या तीन वर्षांपासून कामगारांना पगारवाढच नसल्याने कामगारवर्ग संतप्त आहे.

याबाबत देवस्थानचे अध्यक्ष डॉ. संतोष दुंडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा फोन बंद होता, त्यामुळे सचिव नारायण पाचुंदकर यांचेशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, व्यवस्थापक, मंदिर परिसर याबाबतच्या तक्रारी खुपच आहेत. मात्र, याबाबत 4 जुलै रोजी बैठक आयोजित केली असून, त्यात याबाबत योग्य ती कार्यवाही होईल. दरम्यान, उत्पन्न घटीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, मागील वर्षी उत्पन्न घटले होते खरे आहे, मात्र ते नोटाबंदीमुळे घटले होते. यावर्षीच्या उत्पन्नाची माहिती उपलब्ध झाल्यानंतर योग्य ते समजेल.

अध्यक्षांचा फोन आता होईल चालू...
रांजणगाव देवस्थानचे अध्यक्ष डॉ. संतोष दुंडे यांचा फोन अनेकदा बंदच असल्याच्या तक्रारी आहेत. 'सकाळ' प्रतिनिधीलाही त्याचा प्रत्यय आला आहे. संपूर्ण राज्याचे हे श्रध्दास्थान असलेल्या देवस्थानच्या अध्यक्षांनी फोन बंद करणे राज्यासाठी गंभीर आहे, असे सांगताच डॉक्टर ऑपरेशनमध्ये असल्यावर बंद ठेवतात असे वेळ मारुन नेण्याचे उत्तर श्री. पाचुंदकर यांनी दिले. या पुढे फोन चालू राहील, अशा सुचना आम्ही त्यांना देवू असेही, त्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

Web Title: ranjangaon devasthan trust work and manager issue