चांगल्या छायाचित्रासाठी जंगलाशी समरस व्हावे रानभूल महोत्सवात

In the Rannbhul festival for a good picture
In the Rannbhul festival for a good picture

पुणे : "जंगलात गेल्यावर चांगले छायाचित्र मिळवायचे असेल, तर छायाचित्रकारांनी तेथील परिस्थितीशी समरस होणे महत्त्वाचे आहे. कॅमेऱ्यासमोर असलेल्या वन्यप्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या नैसर्गिक हालचालींमध्ये बदल होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करायला हवेत. वन्यप्राण्यांना "कम्फर्ट' वाटेल, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत,'' असा सल्ला वन्यजीव छायाचित्रकार मोहन थॉमस यांनी दिला. 
निसर्गाच्या पाऊलखुणांचा मागोवा घेणाऱ्या "रानभूल' या वन्यजीव महोत्सवाचे आयोजन "एनव्हॉयर्न्मेंटल फोरम ऑफ इंडिया' व "नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट' यांच्या वतीने करण्यात आले आहे, यात थॉमस बोलत होते. "सकाळ' हे या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहे. महोत्सवासाठी पुणे वनविभाग (वन्यजीव) यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. 

या वेळी थॉमस यांनी देश-विदेशांतील विविध जंगलांमध्ये टिपलेल्या वन्यजीवनांचा प्रवास छायाचित्रांच्या दृकश्राव्य सादरीकरणातून घडविला. वाघीण आणि तिच्यासमवेत बछडे, बिबट्या, सिंह यांचे विविध पैलू उलगडणाऱ्या छायाचित्रांबरोबरच ब्लॅक पॅंथर, धनेश पक्षी, बर्फाळ प्रदेशातील अस्वल, लाल पांडा, लाल-हिरवा मकाऊ अशा वन्यजीवांचे दर्शन थॉमस यांच्या सादरीकरणातून झाले. 

"जंगल सफरीवर जाणारे हौशी पर्यटक छायाचित्र काढण्याच्या नादात वन्यप्राण्यांच्या अगदी जवळ गाडी नेण्यास सांगतात. माणसांच्या या कृत्यामुळे वन्यप्राण्यांना असुरक्षित वाटते आणि त्यांच्या सहज हालचालींमध्ये बदल होतो. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक छटा कॅमेऱ्यात टिपणे जिकिरीचे होते. त्यामुळे प्राण्यांच्या नैसर्गिक विविध भावछटा टिपण्यासाठी तेथील वातावरणात समरस होणे तितकेच महत्त्वाचे आहे,'' असेही थॉमस यांनी नमूद केले. 

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी "द फरगॉटन टायगर्स' हा माहितीपट वैशिष्ट्यपूर्ण ठरला. व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यातील वाघांबद्दल आपण कायमच बोलतो; पण त्याबाहेर आढळणारे वाघ आणि त्यातून समोर येणाऱ्या असंख्य प्रश्‍नांवर या माहितीपटाद्वारे प्रकाश टाकण्यात आला. कृष्णेंदू बोस यांनी निर्मित केलेला हा माहितीपट पाहण्याची संधी वन्यप्रेमींना या महोत्सवानिमित्त मिळाली. "नेचर वॉक'चे अनुज खरे यांनी प्रास्ताविक केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com