#Punecrime ‘ईझी मनी’साठी खंडणीकडे ओढा 

पांडुरंग सरोदे
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

काही दिवसांपूर्वी कथित माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू होते. तरुणांकडून पैशांच्या हव्यासापोटी अपहरण व खंडणीचे प्रकार केले जात आहेत. त्यामध्ये सराईत गुन्हेगार कमी असून, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसलेल्या तरुणांचा सहभाग अधिक आहे. 

पुणे- मोठे व्यावसायिक आणि बांधकाम व्यावसायिकांचे खंडणीसाठी अपहरण करण्याचे प्रकार शहरात घडत असतानाच आता छोटे व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांचेही खंडणीसाठी अपहण करण्याच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी कथित माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू होते. तरुणांकडून पैशांच्या हव्यासापोटी अपहरण व खंडणीचे प्रकार केले जात आहेत. त्यामध्ये सराईत गुन्हेगार कमी असून, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसलेल्या तरुणांचा सहभाग अधिक आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मार्केट यार्ड येथील व्यापाऱ्याचे मागील आठवड्यात खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते, तर काही महिन्यांपूर्वी भवानी पेठेतील एका व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये संबंधित व्यक्तींच्या सुटकेसाठी कोट्यवधी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासानंतर यात एक ते दोन आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे पुढे आले; मात्र उर्वरित आरोपी हे तरुण असून, त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नव्हती. त्यांना केवळ झटपट श्रीमंत होण्याचे आमिष दाखवून या प्रकरणांमध्ये ओढल्याचे निष्पन्न झाले होते. 

संबंधित तरुणांकडून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीशी वेगवेगळ्या कारणांनी ओळख वाढविली जाते. त्यानंतर त्यांच्यातील कमकुवत दुवे लक्षात घेऊन अपहरणाचा कट रचला जातो. अपहरण करणारे काही तरुण सर्वसामान्य कुटुंबातील आहेत, तर काही तरुणांची कौटुंबिक स्थिती चांगली असतानाही पैशांच्या हव्यासापोटी असे गुन्हे केले जातात.

गांभीर्याने तपास करण्याचे आदेश 
मागील एक ते दीड वर्षापूर्वी खडक व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दोन व्यक्तींचे अपहरण झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांकडून केली जात होती. प्रत्यक्षात पोलिसांनी त्या व्यक्ती हरवल्याची नोंद केली. त्यानंतर काही दिवसांतच दोन्ही व्यक्तींचे खून झाले. या घटनेनंतर संबंधित पोलिसांना धारेवर धरण्यात आले होते. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणांची तत्काळ दखल घेऊन गांभीर्याने तपास करण्याचे आदेश दिले. 

खंडणीच्या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करण्यास प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर अपहरण झालेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका करण्याकडे आम्ही लक्ष देतो. काही तरुण पैशांसाठी असे प्रकार करीत असल्याचे दिसून आले आहे. याबरोबरच खंडणीखोरांविरुद्ध पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईही केली जाते.
- अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ransom in the city of Pune