चोखंदळच ठरताहेत सावज

पांडुरंग सरोदे 
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

गेल्या पाच-सहा वर्षांत ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होऊ लागली. हा प्रकार नेमका काय आहे, कशी होते फसवणूक, त्याचे प्रकार कोणते आणि त्यांच्या जाळ्यात सापडू नये, म्हणून काय काळजी घेता येईल, या प्रश्‍नांवर वृत्तमालिकेद्वारे टाकलेला हा प्रकाश !

पुणे - ‘‘नमस्कार, मी विमा पॉलिसी कंपनीतून बोलतेय. तुमच्या विम्याचा आगाऊ हप्ता भरल्यास तुम्हाला आणखी फायदा होईल,’’ अशा शब्दांत मोबाईलवरील तरुणीने ७० वर्षीय आजींच्या विमा खात्याबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांना आगाऊ पैसे भरण्यासाठी गळ घातली. आजींनी तिच्यावर विश्‍वास ठेवला आणि पावणेअकरा लाख रुपये भरले. त्यानंतरही  पैशांची मागणी होऊ लागली आणि आजींना शंका आली. चौकशीनंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पण, तोपर्यंत पावणेअकरा लाख रुपये हातातून गेले होते. अशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, महिलांची दररोज फसवणूक सुरू आहे. विशेषतः आपल्या चोखंदळपणाविषयी जगभर  ख्याती असणारे पुणेकरच फसवणूक करणाऱ्यांचे सहज सावज ठरत असल्याचे चित्र आहे.

कधी विमा पॉलिसी, तर कधी नोकरीचे आमिष दाखवून, लग्नाच्या बहाण्याने; तर कधी तुम्हाला भारी बक्षीस लागलेय म्हणून, अशी वेगवेगळी एकाहून एक कारणे सांगत; एवढेच नाही, तर अगदी तुमचा जिवलग मित्र रुग्णालयात अत्यवस्थ आहे, त्याला तुमच्याकडून पैशांची गरज आहे, अशी भावनिक साद घालून चोखंदळ पुणेकरांनाच मोबाईल, व्हॉट्‌सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्‌सद्वारे सर्रासपणे फसवणूक सुरू आहे. नागरिकही आपल्याला येणारे फोन, मेसेज, ई-मेल यांची थोडीफारदेखील खातरजमा न करता ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यामध्ये सहज अडकले जात आहेत.

शहरामध्ये नोकरी व गिफ्टचे आमिष दाखवून होणारी फसवणूक सर्वाधिक आहे. अनोळखी व्यक्तीने आपल्या मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर अनेक नागरिक स्वतःच्या बॅंक खात्याविषयीची गोपनीय माहिती त्यास देतात; त्याचबरोबर त्यांच्या मोबाईलवर येणारा ‘ओटीपी’ही त्यांना सांगतात, त्यानंतर मोठा आर्थिक फटका बसल्याचे संबंधित व्यक्तींच्या निदर्शनास येते. सर्वसामान्यांना फसविण्याचे सगळे मार्ग अवलंबविल्यानंतर आता स्वतः लष्करी अधिकारी किंवा जवान असल्याचे भासवूनही नागरिकांना महागड्या वस्तू स्वस्तात देण्याच्या बहाण्याने फसवणूक होत आहे. 

नोकरीच्या आमिषाने गंडा
विप्रो कंपनीमध्ये ‘ज्युनिअर प्रोजेक्‍ट मॅनेजर’ म्हणून नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तींनी सदाशिव पेठेतील एका २६ वर्षीय तरुणाची आर्थिक फसवणूक केली. फिर्यादींची मोबाईलवरूनच मुलाखत घेऊन, त्यांना वारंवार ई-मेल करून, बॅंक खाते उघडण्यासाठी, प्रशिक्षणासाठी बॅंक खात्यामध्ये एक लाख ६ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादी यांना प्रतिसाद न देता त्यांची फसवणूक केली. 

गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांना फसविण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे अनोळखी व्यक्तींवर विश्‍वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नयेत. सत्यता पडताळल्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार घडणार नाहीत.
- संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा

बक्षिसाची लालूच
सदाशिव पेठेतच राहणाऱ्या एका ३३ वर्षीय महिलेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने तुम्हाला ‘एफ. बी. स्टार’चे बक्षीस लागल्याचा वारंवार मेसेज पाठविला. त्यानंतर फिर्यादी यांच्याशी व्हॉट्‌सॲपद्वारे संपर्क वाढविला. त्यानंतर फिर्यादी यांना बक्षीस घेण्यासाठी प्रक्रिया शुल्क, जीएसटी शुल्क भरायचे असल्याची वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून दहा हजार २५० रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित व्यक्तीने प्रतिसाद दिला नाही. 

गेल्या दोन वर्षांत शहरामध्ये झालेल्या फसवणुकीचे गुन्हे
फसवणुकीचे प्रकार                              २०१८                   २०१९ (जानेवारी ते मार्च)                  
विमा                                               ६०                       १३                                  
नोकरी                                             ४३०                      १०२
लॉटरी                                             २३                        १०
कर्ज                                               १३४                      ६३
लग्न/फेसबुक/व्हॉट्‌सॲप, गिफ्ट                 १९८                      ९६  
पर्यटन/हॉलिडे पॅकेज                              २५                        २३
-----------------------------------------------------------------------------------
एकूण                                              ८७०                        ३०७

Web Title: Rapid growth in the number of cases of online fraud in pune