esakal | जुन्नरमधील लेण्यांत आढळले दुर्मीळ खेळांचे पट I Caves
sakal

बोलून बातमी शोधा

Caves

जुन्नरमधील लेण्यांत आढळले दुर्मीळ खेळांचे पट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जुन्नर - परिसरातील कोरीव लेणी गटसमुहाचा अभ्यास करताना काही लेण्यांमधील सपाट पृष्ठभागावर खोदलेल्या स्वरूपात दुर्मिळ खेळाचे पट आढळले, अशी माहिती प्राचीन इतिहासाचे अभ्यासक बापुजी ताम्हाणे यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, जुन्नरजवळील किल्ले शिवनेरीच्या दक्षिण बाजूच्या लेणी गटसमूहातील लेणी क्रमांक ५९च्या जोड लेणीतील उजव्या बाजूकडील खोलीतील मोठ्या मंडपात आणि लेण्याद्री, भिमाशंकर लेणीमधील खालील सपाट पृष्ठभागावर अनुक्रमे ‘वाघ-बकरी’, ‘मंकाला’, ‘चौसर’ यासारख्या दुर्मिळ बैठ्या खेळाचे पट खोदलेले दिसून येतात.

जुन्नरचा नाणेघाट, दाऱ्याघाट, बोरघाट ह्या व्यापारी मार्गाने कल्याण, सोपारा, भंडोज अशा समुद्रमार्गे पाश्चिमात्य देशात व्यापार होत असताना मध्ययुगीन काळातील व्यापाऱ्यांनी अशा प्रकारचे बैठे खेळ जुन्नरला आणले असावेत. शिवनेरी किल्ला लेणी परिसरात असणारे शिपाई, पहारेकरी, व्यापारी, डोंगराला गुरे चरत असताना गुराखी लोकांबरोबर अन्य लोक हे बैठे खेळ रिकाम्या वेळेत खेळत असावेत.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी पाचशेच्या आत रुग्ण

असे खेळतात पट

‘वाघ-बकरी’, ‘मंकाला’, ‘चौरस’ हे खेळ आजही काही खेड्यातून खेळले जातात. बुद्धीबळासारखे खूप रोमांचक असे हे खेळ आहेत. या खेळात दोन खेळाडू असतात. त्यात एकाकडे खेळाप्रमाणे चार वाघ आणि दुसऱ्या खेळाडूकडे दहा बकरे असल्याने वाघाच्या खेळाडूला सर्व बकऱ्यांची शिकार करावी लागते आणि बकरी खेळाडूला वाघाला अडवावे लागते. जर वाघाने सर्व बकऱ्याची शिकार केली, तर वाघ खेळाडू विजयी होतो. काही बैठ्या पटाच्या खेळाच्या जवळ लहान गोल खड्डे खोदलेले आढळतात. अशा प्रकारचे बैठे पट खेळ लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजन, विरगुंळ्याची गरज म्हणून खेळले जात. मुख्य म्हणजे, हे बैठे खेळ खेळण्यासाठी लागणारी कवडी अतिशय साधी असते. हे खेळ बुद्धीला चालना देण्यासाठी व वेळ घालवण्यासाठी आजही खेडेगावातून खेळले जातात.

जुन्नर परिसरातील लेण्यांमध्ये आढळलेले बैठे खेळाचे असे खोदीव पट भाजे, कार्ला, पातळेश्वर, रायगड, जेजुरी, सिंहगड अन्य कित्येक गड किल्ले व लेण्यामध्ये दिसून येतात.

- बापूजी ताम्हाणे, इतिहास अभ्यासक

loading image
go to top