रसिलाच्या खुनातील संशयिताचा तपास व्हावा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

पुणे - आयटी अभियंता रसिला ओपी हिच्या खुनामागे आणखी एखादी व्यक्‍ती असावी, असा संशय व्यक्‍त करीत, त्याचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी तिचे वडील आणि भावाने पोलिस आयुक्‍तांकडे केली आहे. 

पुणे - आयटी अभियंता रसिला ओपी हिच्या खुनामागे आणखी एखादी व्यक्‍ती असावी, असा संशय व्यक्‍त करीत, त्याचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी तिचे वडील आणि भावाने पोलिस आयुक्‍तांकडे केली आहे. 

सुरक्षारक्षक भाबेन सैकिया याने अभियंता रसिला हिचा केबलने गळा आवळून खून केला. ही घटना हिंजवडी येथील इन्फोसिस आयटी कंपनीत नुकतीच घडली. या घटनेनंतर तिचे वडील राजू ओपी, भाऊ लेजिन कुमार, चुलते आणि पुणे मल्याळी फेडरेशनचे राजन नायर यांनी गुरुवारी पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांची भेट घेतली. यानंतर ते म्हणाले, की या गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. मात्र, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्‍ती करण्यात यावी, आयटी कंपनीतील महिलांच्या सुरक्षिततेबाबत आवश्‍यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, रसिलाच्या कुटुंबीयांनी खुनाच्या दिवशीचे कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची इच्छा पोलिसांकडे व्यक्‍त केली, त्यावर त्यांना ते फुटेज दाखविण्यात येणार आहे. 

दरम्यान, इन्फोसिस कंपनीने रसिलाच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पुणे मल्याळी फेडरेशनने लावून धरली, त्यामुळे कंपनीने ती रक्‍कम देण्याची तयारी दर्शविली आहे, असे फेडरेशनचे नायर यांनी सांगितले.

 

Web Title: rasila opi murder case