#MarathaKrantiMorcha मराठा आरक्षणासाठी करंजेपूल येथे रास्ता रोको

संतोष शेंडकर
बुधवार, 25 जुलै 2018

परिसरातील दहा-बारा गावांमधून पाचशेपेक्षा अधिक लोक करंजेपूल येथील मुख्य चौकात आज सकाळी जमले होते. मुख्य चौकातच नीरा-बारामती रस्ता व मोरगाव-फलटण रस्ता अडवून धरण्यात आला.

सोमेश्वरनगर :नीरा-बारामती या प्रमुख मार्गावर करंजेपूल (ता. बारामती) येथे आज शेकडो कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणासाठी पन्नास मिनिटांचे रास्ता रोको आंदोलन केले. तसेच करंजेपूलच्या बाजारपेठेतही आज दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. 

परिसरातील दहा-बारा गावांमधून पाचशेपेक्षा अधिक लोक करंजेपूल येथील मुख्य चौकात आज सकाळी जमले होते. मुख्य चौकातच नीरा-बारामती रस्ता व मोरगाव-फलटण रस्ता अडवून धरण्यात आला. याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोफणे, विशाल गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य अप्पाजी गायकवाड, करंजेपूलचे सरपंच वैभव गायकवाड, माजी उपसरपंच शिवाजी गायकवाड, सोरटेवाडीचे सरपंच दत्तात्रेय शेंडकर, बारामती दूध संघाचे संचालक कौस्तुभ चव्हाण, कैलास मगर, करंजे सोसायटीचे अध्यक्ष अनिल गायकवाड, उपाध्यक्ष हनुमंत शेंडकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.        

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विक्रम भोसले, नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे, युवा कार्यकर्ते ऋषिकेश गायकवाड आदींनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांचा समाचार घेत आरक्षणातील अडथळे स्पष्ट केले. तर सुरेश शेंडकर, शिवाजी शेंडकर, प्रदीप कणसे आदींनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. बाळासाहेब गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

सभेनंतर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे, गाव कामगार तलाठी एस.बी.जगताप व अरूण होळकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे, सरसकट कर्जमाफी मिळावी, कोपर्डीतील नराधमांना त्वरीत फाशी व्हावी, महाभरती स्थगित करावी, मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, असे म्हटले आहे.

Web Title: Rasta Roko at Karanjepul