राईनपाडा घटनेच्या निषेधार्थ अंथुर्णेमध्ये रास्तारोको आंदोलन

राजकुमार थोरात
गुरुवार, 5 जुलै 2018

वालचंदनगर (पुणे) : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ अंथुर्णे (ता.इंदापूर ) येथे नाथपंथी समाजाच्या बारामती-इंदापूर राज्यमार्गावर रास्तारोको आंदोलन करुन  गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

वालचंदनगर (पुणे) : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ अंथुर्णे (ता.इंदापूर ) येथे नाथपंथी समाजाच्या बारामती-इंदापूर राज्यमार्गावर रास्तारोको आंदोलन करुन  गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

गेल्या काही आठवड्यांपासून लहान मुलांना पकडणारी टोळी आल्याच्या अफवा सोशल मिडीयावरून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.  धुळे जिल्ह्यातील राईनपाडा (ता.साक्री) येथे गेल्या तीन-चार दिवसापूर्वी रोजी मंगळवेढा तालुक्यातील नाथपंथी समाजातील पाच नागरिक उदरनिर्वाहासाठी गेले होते. तेथील आठवडे बाजारात बहुरूप्याच्या वेशात कला सादर करत असताना नागरिकांबाबत लहान मुलांना पकडून नेणारी टोळी असल्याबाबत स्थानिक लोकांचा गैरसमज झाला. या गैरसमजातून तेथील जमावाने या पाच बहुरूप्यांना लाथा,बुक्क्या,काठी मारल्याची घटना घडली.  या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. 5) अंथुर्णे येथील नाथपंथी समाजातील नागरिकांनी  इंदापूर-बारामती राज्यमार्गावर एक तास रास्तारोको  अांदोलन करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच राहुल साबळे,अॅड.बापूराव साबळे,बाबजी भोंग,अर्जुन शिंदे,अमर बोराटे व भटक्या जाती-जमातीचे गुलाबराव वाघमोडे यांनी घटनेचा निषेध करुन मनोगत व्यक्त केले.   तसेच  यावेळी घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी, तपास सीबीआय कडे द्यावा,मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी २५ लाखांची मदत करुन  ,मृतांच्या कुटुंबातील व्यक्तींना शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात भरणेवाडी सोसायटीचे चेअरमन आबासाहेब भरणे,माजी सरपंच दत्तात्रेय गायकवाड,विशाल साबळे,नाना पाटील,भरणेवाडीचे उपसरपंच गुलाब म्हस्के, सुरज वनसाळे  यांच्यासह भटक्या जाती-जमातीतील असंख्य महिला व पुरुष सहभागी झाले होते.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये...
या घटनेबाबत बोलताना वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांनी सांगितले की, सोशल मिडीयावरील अनेक अफवा पसरविण्यात येत आहेत. नागरिकांनी अफवा विश्‍वास ठेवू नये.तसेच अफवा  पसरवू नये. अनओळखी व्यक्तीला मारहाण करण्याचा प्रकार करुन नये. अनओळखी व्यक्ती दिसल्यास मारहाण न करता पोलिसांना फोनवरुन तातडीने माहिती द्यावी. मारहाण केल्यास  गुन्हे दाखल करण्याचा इशारा काटे यांनी दिला.

Web Title: rasta roko for rainpada murder case in anthurne