स्वस्त धान्य देईल का कुणी...? 

स्वस्त धान्य देईल का कुणी...? 

पिंपरी  - पिंपरी आणि चिंचवड भागातील 285 रास्त भाव धान्य दुकानांपैकी सुमारे शंभरहून अधिक दुकाने यापूर्वीच कायमस्वरूपी बंद झालेली असताना उर्वरित दुकानेही बऱ्याचदा बंद राहत आहेत. त्यामुळे नागरिकांना दुकानाचे उंबरे झिजवावे लागतात. अनेकदा धान्य मिळण्यास विलंब होतो, दुकानदार दुरुत्तरे देतात, अशा शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी आहेत. मात्र, धान्यपुरवठा सुरळीत सुरू असून, दुकानांबद्दलच्या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई केली जात असल्याचा दावा अन्न व पुरवठा विभागाने केला आहे. 

शहर अन्न व नागरी पुरवठा विभागाची शहरात पिंपरी ("ज' विभाग), चिंचवड ("अ' विभाग) आणि भोसरी ("फ' विभाग) कार्यालये कार्यरत आहेत. त्यापैकी पिंपरी विभागात 137 पैकी 78 रास्त भाव धान्य दुकाने चालू असून, उर्वरित दुकाने यापूर्वीच बंद झाली आहेत. चिंचवड विभागात 148 पैकी 94 दुकाने चालू असून, उर्वरित दुकाने बंद आहेत. ई-पॉस मशिन यंत्रणा चालू होण्यापूर्वीच ही दुकाने बंद झाली आहेत. या दुकानांशी संबंधित शिधापत्रिकाधारक जवळपासच्या दुकानांना जोडण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित दुकानांपैकी बरीच दुकाने अनेकदा बंद राहत असल्याच्या तक्रारी शिधापत्रिकाधारकांनी केल्या आहेत.

एखाद्या वेळी दुकान उघडे असल्यास दुकानदार दुरुत्तरे देतात. धान्य मिळण्यासही विलंब होतो, असेही शिधापत्रिकाधारकांचे म्हणणे आहे. शहर अन्न व पुरवठा विभागाकडून दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत अन्न सप्ताह साजरा केला जातो. वास्तविक, महिनाभर दुकाने उघडी राहून शिधापत्रिका धारकांना धान्य उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. मात्र, या सप्ताहात धान्य उचलावे, अशी अपेक्षा विभागाकडून धरली जात आहे. 

परिमंडल अधिकारी ("अ' व "ज' विभाग) दिनेश तावरे म्हणाले, ""विभागाकडून दरमहिन्याच्या सात तारखेला अन्नदिन साजरा केला जातो. तर 8 ते 15 तारखेपर्यंत अन्न सप्ताहाचे आयोजन केले जाते. प्रत्येक वेळी महिन्याभर अगोदर धान्याचे वितरण शहर कार्यालयाला कळवावे लागते. त्यानुसार दरमहिन्याला शिधापत्रिकाधारकांसाठी धान्य वितरण करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही केली जाते. धान्य वितरणाची प्रक्रिया ऑनलाईन झाल्याने कोणत्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये किती धान्य शिल्लक राहिले आहे, हे समजते. एखाद्या महिन्याला धान्य शिल्लक राहिल्यास त्याबाबत दुकानदाराकडे विचारणा केली जाते. मात्र, काही वेळी शिधापत्रिकाधारक महिन्याच्या अखेरीला धान्य घेण्यासाठी दुकानांत जातात. त्यामुळे पुढील महिन्याच्या धान्य नियतनाबाबत कार्यवाही करण्यात अडचणी येतात. शिधापत्रिकाधारकांनी दर महिन्याच्या पंधरा तारखेच्या आत दुकानांमधून धान्य उचलावे.'' 

""धान्याचे सर्व वाटप केल्याशिवाय दुकानदारांना त्यांचे कमिशन मिळत नाही. त्यामुळे दुकाने चालूच असतात. शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यास प्राधान्य आहे. रॉकेटचे वाटप यापूर्वीच बंद झाले आहे. त्यामुळे ही दुकाने बंद झाली आहेत.'' 
- विजय गुप्ता, प्रदेश खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप कीपर फेडरेशन 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com