'सदाभाऊंची आठवण आली नाही, असा एकही दिवस नाही'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

ज्यावेळी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करत होतो. त्यावेळी मला सदाभाऊंची आठवण आली नाही, असा एक दिवस नव्हता.

पुणे : राजकारणात कधी कोणतं पारडं कुणाच्या बाजूला झुकेल हे त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना सांगणंही कठीण जातं. कधी कुणाशी सलगी निर्माण होईल, तर कोण कुणाशी वित्तुष्ट ओढवून घेईल, याचा अंदाज बांधता येत नाही. तसाच काहीसा प्रकार शनिवारी (ता.28) राजकीय विश्वात घडला.

कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत हे सर्वांना परिचित आहेतच. याच सदाभाऊ खोतांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर काढण्यात रविकांत तुपकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होत. त्याच तुपकरांनी शनिवारी खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला. आणि यावेळी ते म्हणाले की, ''ज्यावेळी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करत होतो. त्यावेळी मला सदाभाऊंची आठवण आली नाही, असा एक दिवस नव्हता."

रयत क्रांती संघटनेचा राज्यव्यापी पदाधिकारी मेळावा व प्रवेश कार्यक्रम गरवारे हॉल येथे पार पडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर आणि कार्यकर्त्यांनी सदाभाऊंच्या उपस्थितीत रयत क्रांती संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी खोत म्हणाले, ''शरद जोशींबरोबर जीव ओतून निष्ठेने काम केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये प्रस्थापितांच्या छाताडावर बसून न्याय मागण्याची हिंमत आणली. आम्ही जीवाचं रान करून महाराष्ट्रभर चळवळ उभी करत असताना कधीही घराकडे वळून पाहिले नाही. या चळवळीत काम करत असताना बगलबच्चांवर विश्वास ठेवून लढणाऱ्या कार्यकर्त्यांचे पाय बांधण्याचे काम केले. सरकारमध्ये गेल्यावर आमची भाषा बदलली नाही. सरकारच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.''

रविकांत आणि मी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक असायला हवे होते, पण त्यावेळी तसे झाले नाही. रवीची मला आणि माझी रवीला कधी आठवण आली नाही, असे कधी झाले नाही. स्वाभिमानी संघटनेतून जो बाहेर पडतो, त्याला ते लोक गद्दार म्हणून बदनाम करण्याचे एकच काम करतात. रवी आणि मी आम्ही दोघांनी मिळून अनेक आंदोलने एकत्र केली आहेत. तो पुन्हा माझ्यासोबत आला, त्यामुळे मनाला समाधान होत आहे. रविकांत तुपकर हा लढणारा आणि आक्रमक कार्यकर्ता आहे, त्याला पुढील काळात नक्कीच बळ दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

तुपकरांनीही आपले मनोगत यावेळी केले. ते म्हणाले, खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली जिल्ह्यापुरती न ठेवता ती महाराष्ट्रभर पोहचवली. त्यांनी शेतकऱ्याला मंत्रालयापर्यंत पोहोचवले. मी ज्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करत होतो, त्यावेळी मला सदाभाऊंची आठवण आली नाही, असा एकही दिवस नव्हता. माझा चळवळीचा पिंड असल्यामुळे मी रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केला.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी रान पेठवण्याची ताकद फक्त सदाभाऊ खोत यांच्यामध्ये आहे. संघटना सोडून गेलेल्या व्यक्तीला गद्दार ठरवणाऱ्या लोकांनी स्वतःचे चळवळीतील योगदान पाहून टीका करावी. यापुढे मी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून चळवळीचे काम करत राहणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : मनसेच ठरलं! राज ठाकरे उतरणार मैदानात

- Navratri Festival 2019 : आई राजा उदो-उदोच्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना

- Vidhan Sabha 2019 : आता 'या' तारखेला होणार नारायण राणेंचा भाजपप्रवेश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravikant Tupkar said that I never forget Sadabhau Khot