रविंद्र बऱ्हाटे, देवेंद्र जैनच्या अडचणी वाढल्या, कारण...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

रविंद्र बऱ्हाटे, देवेंद्र जैनसह 12 जणांविरुद्ध बेकायदा सावकारी व बंगला बळकाविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

पुणे : केटरिंग व्यावसायिकास जादा व्याजदराने कर्ज देऊन, कर्जाची रक्कम व त्यासमवेत फिर्यादीचा बंगला बळकाविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन यांच्यासह 13 जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध यापुर्वीही वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात सात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रविंद्र बऱ्हाटे, देवेंद्र जैन, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, परवेज जमादार, विशाल ढोरे, विनोद ढोरे, सुजीत सिंह, अस्लम पठाण, बालाजी लाखाडे, सचिन धिवार, विठ्ठल रेड्डी, गणेश आमंदे, नितीन पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 58 वर्षीय केटरींग व्यावसायिकाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी प्रतिबंध कायदा, अनुसूचित जाती-जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे केटरींग व्यावसायिक आहेत. त्यांना संशयित आरोपींनी बेकायदा सावकारी करून व्यावसायासाठी वार्षिक 60 टक्के व्याजाने कर्ज दिले होते. दरम्यान, व्याजाने दिलेली रक्कम परत घेण्यासाठी व फिर्यादी यांच्या मांजरी येथील स्वमालकीचा बंगला आपल्या नावावर करुन द्यावा, अशी मागणी करीत संशयित आरोपींनी फिर्यादी यांना वेळोवेळी पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच फिर्यादीच्या पत्नी व मुलाला देखील जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच संशयितांकडून फिर्यादीस वेळोवेळी अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू होता. दरम्यान, संबंधीत संशयित आरोपींविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्क्षाची माहिती फिर्यादींपर्यंत पोचली. त्यानंतर त्यांनीही पोलिसांकडे फिर्याद दिली. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ravindra barhate, devendra jain and 12 others were booked in the case of illegal lending