esakal | ...म्हणून रविंद्र बऱ्हाटेने घेतली नाही कोरोना प्रतिबंधक लस !
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

...म्हणून रविंद्र बऱ्हाटेने घेतली नाही कोरोना प्रतिबंधक लस !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - खंडणी, जीवे मारण्याची धमकी, जमिन बळकाविण्यासह विविध गंभीर गुन्ह्यासह महाराष्ट्र गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोका) कारवाई (Crime) झालेला माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे (Ravindra Barhate) हा वर्षभर पोलिसांना गुंगारा देत होता. त्यासाठी आवश्‍यक सर्व प्रकारची काळजीही तो घेत होता. कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) घेण्यासाठी आधारकार्डचा वापर केल्यास, आपण पोलिसांच्या हाती लागू, यामुळे बऱ्हाटेने कोरोना लस घेण्याचेही टाळले. मात्र पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी बऱ्हाटेस कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्राधान्य दिले. (Ravindra Barhate did not take the Corona Vaccine)

बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून बऱ्हाटे फरारी होता. पुणे पोलिसांकडून रविंद्र बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध "मोका'अंतर्गत कारवाई केली. त्याच्या इतर साथीदारांना अटक केली, तर काही दिवसांपुर्वी बऱ्हाटेची पत्नी, मुलगा व वकीलालाही पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर बऱ्हाटे पोलिसांच्या हाती लागला.

हेही वाचा: देशातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प औरंगाबादमध्ये

दरम्यान, मागील वर्षभरापासून बऱ्हाटे हा पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी विविध क्‍लृप्त्या लढवित होता. मोबाईल, इंटरनेटचा वापर टाळण्यापासून ते कुटुंबीय, जवळच्या व्यक्तींच्या संपर्कात राहण्याचेही टाळत होता. त्याचबरोबर कोरोना संसर्ग वाढत असतानाही बऱ्हाटेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचेही टाळले होते. बऱ्हाटे हा कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आधार कार्डचा वापर नक्की करेल, कार्डचा वापर केल्याचे तांत्रिक तपासामध्ये लक्षात आल्यानंतर त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी सोपे जाणार होते. हे बऱ्हाटेला माहिती असल्याने त्याने लस घेतली नव्हती.

दरम्यान, पोलिसांनी बऱ्हाटेला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त व तपासी अंमलदार सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या देखरेखीखाली बऱ्हाटेची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यानंतर त्यास कोविशील्ड कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. बऱ्हाटेची 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी आहे. त्यामध्ये पोलिस त्याची सखोल चौकशी करणार आहेत.

loading image