रवींद्र बऱ्हाटे पोलिसांच्या हाती लागेना; फरार घोषित करून उलटले १७ दिवस

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांत अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून त्याने अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. मात्र तेथेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला नाही.

पुणे : खंडणी, धमकाविणे, बेकायदा सावकारी आणि आर्थिक फसवणूक अशा गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी त्याला फरार घोषित करून सोमवारी (ता.9) 17 दिवस उलटले आहेत.

मेहबूबांनी पुन्हा सूर बदलला; तिरंग्याबद्दलच्या वक्तव्याबाबत केला खुुलासा​

विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांत अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून त्याने अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. मात्र तेथेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर बऱ्हाटे पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे त्याला पुणे पोलिसांनी 23 ऑक्‍टोंबर रोजी फरारी घोषित केले आहे. बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्याकडे खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात आठ आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे.
बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली आहे. मात्र बऱ्हाटे हा पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून शहरातून पसार झाला आहे. बऱ्हाटेची लुल्लानगर, धनकवडीतील तळजाई पठार येथे घरे आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी तेथे छापा टाकून काही कागदपत्रे जप्त केली आहे. मात्र बऱ्हाटे पोलिसांच्या हाती सापडला नाही.

यंदाची दिवाळी पवार कुटुंबियांसाठी वेगळी; घेतला मोठा निर्णय​

तर येथे संपर्क साधा :
बऱ्हाटेबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी त्वरित कोथरूड पोलिस ठाण्याशी (दूरध्वनी क्रमांक 020-25391010 किंवा 25391515 ) संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन कोथरूड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी केले आहे.

हजर होण्याच्या फर्मानाचे शहरात फलक :
बऱ्हाटेने न्यायालयात हजर होण्याचे फर्मान जाहीर करण्यात आले होते. त्याचे फलक शहरातील काही भागात लावण्यात आले आहेत. बऱ्हाटेने सात नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर न्यायालयातील न्यायालय क्रमांक एकसमोर उपस्थित व्हावे, असे या फलकातील फर्मानात नमूद आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravindra Barhate was not found to police even after 17 days of being declared absconding