‘आरसी बुक’ची पुन्हा ‘झीरो पेंडन्सी’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

पुणे - आरसी बुकची ‘झीरो पेंडंसी’ करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) पुन्हा एकदा तयारी सुरू केली आहे. त्यासाठी शासकीय सुट्यांच्या कालावधीत पन्नास हजारांहून अधिक आरसी बुकच्या छपाईचे नियोजन करण्यात आले आहे.

पुणे - आरसी बुकची ‘झीरो पेंडंसी’ करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) पुन्हा एकदा तयारी सुरू केली आहे. त्यासाठी शासकीय सुट्यांच्या कालावधीत पन्नास हजारांहून अधिक आरसी बुकच्या छपाईचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे वाहन नोंदणी केल्यानंतर प्रत्येक वाहनाचे आरसी बुक दिले जाते. डिसेंबर २०१४ पर्यंत आरटीओकडून स्मार्ट आरसी वाहनधारकांना दिली जात होती. मात्र, त्यानंतर स्मार्ट आरसी देणे बंद करण्यात आले. एका कागदावर आरसी बुक छपाई करून वाहनधारकास पुरविले जात असे. मात्र, हा कागद आरटीओ कार्यालयांना वेळेवर मिळत नसे. वाहनांची संख्या व तुलनेने आरसी बुक छपाईसाठी लागणाऱ्या कागदाची कमतरता, यामुळे आरसी छपाई प्रलंबित राहत होती. त्यामुळे गेल्या पाच-सहा महिन्यांपासून या प्रमाणात वाढ होऊन प्रलंबित आरसीची संख्या एक लाखावर पोचली होती. मात्र, गेल्या महिन्यात आरटीओने स्मार्ट प्लॅन आखून २३ ते २५ नोव्हेंबरदरम्यान तब्बल ४६ हजार प्रलंबित आरसींची छपाई केली. त्यानंतर दररोज एक हजार आरसींची छपाई केली जात आहे. 

 दैनंदिन वाहनांच्या संख्येमुळे वाहन नोंदणीच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे सर्व प्रलंबित आरसींची छपाई करण्यासाठी पुन्हा एका तीन दिवसांच्या सलग सुट्यांमध्ये छपाई करून झीरो पेंडंसी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी ३५ कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत करण्यात आली आहे. 

डिसेंबरअखेर सर्व प्रलंबित काम पूर्ण 
आरसी बुकसाठी सध्या कागद उपलब्ध आहेत. त्यामुळे येत्या १० ते १२ डिसेंबरदरम्यान पुन्हा स्मार्ट प्लॅननुसार आरसी बुकची छपाई केली जाणार आहे. तसेच डिसेंबरअखेरपर्यंत दैनंदिन व प्रलंबित सर्व आरसी बुकची छपाई पूर्ण करण्यात येणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी सांगितले.

Web Title: rc book zero pendancy