लोणावळ्यात जुलैमध्ये विक्रमी पावसाची नोंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

जुलै महिन्यात विक्रमी पाऊस नोंदला असून दोन हजार 781 मिलिमीटर (109.48 इंच) पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी हंगामात एकूण चार हजार 933 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला.

लोणावळा : लोणावळ्यात पावसाने यंदा जोरदार थैमान घातले असून नागरिकांचे जनजीवन कोलमडले आहे. पावसाने गेल्या वर्षीची जुलैअखेरची सरासरी ओलांडली असून बुधवारी (ता. 31) सकाळी 144 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लोणावळ्यात 31 जुलैअखेर तीन हजार 357 (132.17 इंच) मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्यावर्षी तीन हजार 249 (127.92 इंच) पावसाची नोंद झाली होती.
जुलै महिन्यातच विक्रमी पाऊस नोंदला असून जुलै महिन्यात दोन हजार 781 मिलिमीटर (109.48 इंच) पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी हंगामात एकूण चार हजार 933 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला.
लोणावळा हे पावसाचे आगर मानले जाते. यंदा पाऊस लांबल्याने मोठे संकट वाटत होते. उशिरा सुरू झालेल्या मोसमी पावसाने सुरवातीस चांगले झोडपल्यानंतर काही काळ उसंत घेतली. पाऊस लांबतो, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन करत आपला कोटा पूर्ण केला. गेले सहा दिवस पावसाने चांगलेच झोडपल्याने लोणावळेकरांची तारांबळ उडाली आहे. त्यात टाटा हायड्रो पॉवर कंपनीच्या वतीने संभाव्य पूरपरिस्थितीचा इशारा दिल्याने हुडको, भांगरवाडी, नांगरगाव परिसरात नागरिकांची झोप उडाली आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती उद्‌भवू नये यासाठी लोणावळा धरणातून डक्‍टलाइन मार्ग टाटा कंपनीच्या वतीने वीजनिर्मितीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

आपत्कालीन कक्ष
लोणावळ्यात पूरपरिस्थिती लक्षात घेता नगरपरिषदेच्या वतीने दिवसरात्र कर्मचारी तैनात केले आहेत. इंद्रायणी नदीपात्रात भांगरवाडी, हुडको तसेच नांगरगाव येथे पुलास अडकलेली जलपर्णी काढण्याच्या काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच पूरपरिस्थिती उद्‌भवल्यास प्रियदर्शिनी संकुल, कन्या शाळा, पंडित नेहरू विद्यालयात तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केल्याची माहिती नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: record break rainn in lonavala

टॅग्स