फुकट्या एक लाख प्रवाशांकडून सहा कोटींचा दंड वसूल
पुणे : रेल्वेच्या पुणे विभागातील विविध स्थानकांवरून गेल्या नऊ महिन्यांत एक लाख 13 हजार फुकट्या प्रवाशांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे सहा कोटी 24 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पुणे : रेल्वेच्या पुणे विभागातील विविध स्थानकांवरून गेल्या नऊ महिन्यांत एक लाख 13 हजार फुकट्या प्रवाशांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे सहा कोटी 24 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांच्या नेतृत्त्वाखाली पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज, मिरज-कोल्हापूर मार्गांवर एक एप्रिल ते 31 डिसेंबर 2018 दरम्यान तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांना प्रत्येकी किमान 250 रुपये दंड करण्यात आला आहे. तसेच जवळच्या अंतराचे तिकीट काढून दूरचा प्रवास करणे, प्रवासात जादा वजनाचे सामान बाळगणे अशा प्रवाशांवरही कारवाई करण्यात आली.
तिकीट तपासणीच्या एकूण मोहिमेत अडीच लाख प्रवाशांकडून 12 कोटी 20 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मागीलवर्षी याच नऊ महिन्यांत दोन लाख 14 हजार प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून 11 कोटी 20 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. जादा वजन जवळ बाळगून प्रवास करायचा असल्यास प्रवाशांनी संबंधित केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
स्वच्छतेसाठी शपथ
पुणे शहरात महापालिकेकडून सुरू असलेल्या स्वच्छता सर्वेक्षणातंर्गत पुणे रेल्वे स्थानकावर कर्मचारी आणि प्रवाशांना गुरुवारी (ता. 10) स्वच्छतेसाठी शपथ देण्यात आली. याप्रसंगी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, मंडळ व्यवस्थापक संजयकुमार दास, स्टेशन डायरेक्टर ए. के. पाठक, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आणि सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळकर, सहायक आयुक्त अरुण खिलारी आदी उपस्थित होते.