Pune News : बालवाडीच्या शिक्षिका व सेविकांना वेतनश्रेणी अन् निवृत्ती वेतन लागू करण्यासाठी लाखो रुपयांची वसुली

पुणे महापालिकेच्या बालवाड्यांमध्ये सुमारे ४९३ शिक्षिका असून, ३३८ सेविका आहेत. शिक्षिकांना प्रति महिना १२ हजार ५०० रुपये तर सेविकांना ९ हजार ५०० रुपये मानधन दिले जाते.
Municipal Teacher
Municipal Teachersakal

पुणे - महापालिकेच्या बालवाडीच्या शिक्षिका व सेविकांना एकवट मानधनाऐवजी वेतनश्रेणी आणि निवृत्ती वेतन करण्यासंदर्भात राज्य सरकारने महापालिकेला अभिप्राय मागविला आहे. हेच निमित्त साधून प्रशासकीय एजंटांनी शासनाकडून हे काम करून आणण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये जमा कर्मचाऱ्यांकडून घेत आहेत. अनेकांनी जणांनी पैसेही भरले आहेत. यामध्ये कायदेशीर अडचणी असतानाही पैसे जमा केले जात असल्याने कर्मचाऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या बालवाड्यांमध्ये सुमारे ४९३ शिक्षिका असून, ३३८ सेविका आहेत. शिक्षिकांना प्रति महिना १२ हजार ५०० रुपये तर सेविकांना ९ हजार ५०० रुपये मानधन दिले जाते. मीरा भाईंदर महापालिकेने २००६ मध्ये बालवाडी शिक्षिकांची २७ पदे कायम करून त्यांना वेतनश्रेणी व निवृत्तिवेतन लागू केले. यासाठी बालवाडीतील चार तास काम आणि त्यानंतर उर्वरित चार तास महापालिकेच्या इतर विभागात काम करून घेतले जात होते.

हे कर्मचारी पूर्णवेळ काम करत असल्याने त्यांना शासनाने मान्यता दिली. याच धर्तीवर पुणे महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका व सेविकांना लाभ देण्याचा प्रस्ताव तयार आहे. पण हे कर्मचारी अर्धवेळ काम करत असल्याने त्यांना हा निर्णय लागू करताना अडचणी निर्माण होणार आहे.

पैसे जमविण्यासाठी धडपड

जे बालवाडी शिक्षिका व सेविका प्रत्येकी एक लाख रुपये देतील त्यांचाच प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल. याबद्दल बाहेर कोणीही वाच्यता करू नये अशी तंबी या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील एका बालवाडीतील शिक्षिकेकडे पैसे गोळा करण्याची जबाबदारी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे, त्यापूर्वी हा निर्णय आवश्‍यक असे, त्यामुळे लवकर पैसे द्या असा तगादा लावण्यात आला आहे. हे पैसे जमा करण्यासाठी शिक्षिका, सेविका व्याजाने तसेच दागिणे गहाण ठेवून पैसे जमा करत आहेत, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

महापालिकेच्या बालवाडी सेविका, शिक्षिकांसदर्भात शासनाने अभिप्राय मागितला आहे. त्यावर वस्तुस्थतीदर्शक माहिती सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे. या कामासाठी कोणी पैसे मागत असले तर त्यांची आमच्याकडे किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी.’

- सुनंदा वाखारे, शिक्षण अधिकारी, महापालिका

बालवाडी शिक्षिकेचे ४९३ तर सेविकांच्या ३३८ जागा आहेत. त्यांना एकवट मानधन दिले जात आहे. त्याऐवजी वेतनश्रेणी, निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात अभिप्राय मागविण्यात आला आहे. कामाची वेळ, बिंदू नियमावली यासह इतर जी स्थिती आहे ती सादर केली जाईल. या कामात कोणी कर्मचारी पैसे मागत असेल किंवा देत असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही.’

- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त

अशी आहे वस्तुस्थिती

- एकवट मानधनावर केवळ चार तास हे कर्मचारी काम करतात

- वेतनश्रेणी लागू होण्यासाठी आठ तास काम करणे अनिवार्य

- शिक्षिका व सेवकांच्या जागांची बिंदू नियमावली नसल्याने आरक्षणाच्या नियमाचे पालन करणे अशक्य

- कुणाल कुमार आयुक्त असताना या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम दिले जात होते, पण तेव्हा त्यास विरोध करण्यात आला

- त्यामुळे हे कर्मचारी अर्धवेळच काम करणारे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com