लाल चुटूक चेरी आली बाजारात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

आकाराने लहान, चवीला आंबट गोड आणि लालचुटूक रंगाच्या ‘चेरी’ या फळाचा हंगाम सुरू झाला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात हिमाचल प्रदेशमधून चेरीची पहिली आवक झाली.

पुणे - आकाराने लहान, चवीला आंबट गोड आणि लालचुटूक रंगाच्या ‘चेरी’ या फळाचा हंगाम सुरू झाला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात हिमाचल प्रदेशमधून चेरीची पहिली आवक झाली. दर्जानुसार प्रतिकिलोस २०० पासून ते २५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. 

हिमाचल प्रदेशमधील फागु या भागातून चेरीच्या सुमारे ४५० बॉक्‍सची आवक झाली. एक किलोच्या बॉक्‍समध्ये या चेरी उपलब्ध असून, त्या ग्राहकांचे आकर्षण ठरत आहेत, अशी माहिती चेरीचे व्यापारी करण जाधव यांनी दिली.  

मिशरी आणि मखमली या चेरीच्या प्रमुख दोन जाती. सध्या मिशरी जातीच्या चेरींची आवक होत आहे. मिशरी चेरी ही चवीला आंबटगोड असून, ती साधारण दोन दिवस टिकते. तर, चवीला गोड असलेली मखमली चेरी दोन दिवस टिकते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी हवामान चेरीसाठी पोषक असल्याने दरही आटोक्‍यात आले आहे. चेरीला घरगुती ग्राहक आणि स्टॉलविक्रेते यांच्याकडून चांगली मागणी आहे. चेरीचा हंगाम आणखी १५ ते २० दिवस सुरू राहील. मात्र, पावसाला सुरवात झाली, तर तो लवकर संपेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगल्या प्रमाणात आवक होत असल्याने भावही आवाक्‍यात आहेत. काश्‍मीर चेरी हंगाम सुरू होण्यास महिनाभर कालावधी लागेल. तो हंगाम जुलैपर्यंत चालेल, असेही जाधव यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: red pinch cherry in market