व्हॅलेंटाइनला मावळमधील गुलाबांचा सुगंध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

वडगाव मावळ - ‘व्हॅलेंटाइन डे’साठी मावळ तालुक्‍यातून परदेशात तसेच स्थानिक बाजारपेठेत सुमारे दोन कोटी २५ लाख गुलाब फुलांची विक्री होऊन सुमारे पंचवीस कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती तालुक्‍यातील फूल उत्पादकांनी दिली. निर्यातीपेक्षा स्थानिक बाजारपेठेत फुलांना मिळालेला चांगला दर हे यंदाच्या हंगामाचे वैशिष्ट्य ठरले.

वडगाव मावळ - ‘व्हॅलेंटाइन डे’साठी मावळ तालुक्‍यातून परदेशात तसेच स्थानिक बाजारपेठेत सुमारे दोन कोटी २५ लाख गुलाब फुलांची विक्री होऊन सुमारे पंचवीस कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती तालुक्‍यातील फूल उत्पादकांनी दिली. निर्यातीपेक्षा स्थानिक बाजारपेठेत फुलांना मिळालेला चांगला दर हे यंदाच्या हंगामाचे वैशिष्ट्य ठरले.

मावळ तालुक्‍यात सुमारे दीड हजार एकर क्षेत्रावर गुलाब फुलांचे उत्पादन घेतले जाते. विविध कॉर्पोरेट कंपन्यांसह सुमारे हजार ते बाराशे शेतकरी फूलशेती करतात. देशातील एकूण उत्पादनाच्या साठ ते सत्तर टक्के फुलांचे उत्पादन एकट्या मावळात होते. ‘व्हॅलेंटाइन डे’साठी २५ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान परदेशात फुले पाठविण्यात आली. ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान दिल्ली, जयपूर, पटना, अलाहाबाद, अहमदाबाद, नागपूर, पुणे, मुंबई या स्थानिक बाजारपेठेत फुले विक्रीला गेली. 

सुरवातीच्या काळात थंडीमुळे फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यामुळे निर्यात काळात पंधरा ते वीस टक्के उत्पादन कमी झाले होते. मात्र, शेवटच्या दोन-तीन दिवसांत तापमान वाढल्याने फुलांचे उत्पादन वाढले व स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी अधिक फुले उपलब्ध झाली. परदेशापेक्षा स्थानिक बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी होती व दरही चांगला मिळाला.

परदेशात एका फुलाला सरासरी बारा रुपये तर स्थानिक बाजारपेठेत सरासरी दहा रुपये दर मिळाला. निर्यातीपेक्षा स्थानिक बाजारपेठेत फुलांना असलेली चांगली मागणी व मिळालेला चांगला दर ही यंदाच्या व्हॅलेंटाइन डेच्या हंगामाचे वैशिष्ट्य ठरले, अशी प्रतिक्रिया तळेगाव फ्लोरिकल्चर पार्क फूल उत्पादक सहकारी संस्थेचे सचिव मल्हार ढोले यांनी दिली.

वीस दिवसांच्या कालावधीत परदेशात सुमारे ७५ लाख तर स्थानिक बाजारपेठेत सुमारे दीड कोटी फुलांची विक्री झाली. त्यातून सुमारे पंचवीस कोटी रुपयांची उलाढाल झाली. एकूणच यंदाचा हंगाम फूल उत्पादकांसाठी आनंददायी ठरला. 
- शिवाजी भेगडे, अध्यक्ष, जिल्हा फूल उत्पादक संघ

Web Title: Red Rose Valentine Day 2019