दुःखी जिवांसाठी द्रवते रेखाचे हृदय, तिघांना मिळवून दिला 'माहेर'चा आधार

कृष्णकांत कोबल
गुरुवार, 26 जुलै 2018

मांजरी - स्वतःच्याच घरात अठरा विश्र्व दारिद्र्य, त्यासाठी दिवसा एका छोट्याशा कारखान्यात तर रात्री रूग्णसेविका म्हणून दुसऱ्यांच्या घरात ती खपते आहे. याबाबत तिची काही तक्रार नाही. उलट येता-जाता रस्त्यावर किंवा वळचणीला पडलेल्या दुःखी जिवांसाठी तीचे हृदय द्रवते, आणि कुठलाही इव्हेंट आयोजित न करता तेथेच तिची समाजसेवा मूकपणे सुरू होते. रेखा पिंटप्पा ताटीपामुल असे या महिलेचे नाव असून, गेल्या अनेक वर्षापासून स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून इतर पिडितांसाठीही ती मदतीचा हात देताना दिसते.

मांजरी - स्वतःच्याच घरात अठरा विश्र्व दारिद्र्य, त्यासाठी दिवसा एका छोट्याशा कारखान्यात तर रात्री रूग्णसेविका म्हणून दुसऱ्यांच्या घरात ती खपते आहे. याबाबत तिची काही तक्रार नाही. उलट येता-जाता रस्त्यावर किंवा वळचणीला पडलेल्या दुःखी जिवांसाठी तीचे हृदय द्रवते, आणि कुठलाही इव्हेंट आयोजित न करता तेथेच तिची समाजसेवा मूकपणे सुरू होते. रेखा पिंटप्पा ताटीपामुल असे या महिलेचे नाव असून, गेल्या अनेक वर्षापासून स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून इतर पिडितांसाठीही ती मदतीचा हात देताना दिसते.

कपड्याचेही भान नसणाऱ्या तीन मनोरूग्णांना तीने स्वतः पुढाकार घेऊन व प्रयत्न करून माहेर संस्थेतील अनाथाश्रमात दाखल केले आहे. त्यांची वेळोवेळी आस्थेने चौकशीही करते. मात्र, हे करीत असताना तीला मोठा त्रास झाला. रात्री साडेबारा एक वाजे पर्यंत प्रयत्न करून पोलींसाची मदत घेणे, रूगणवाहिका बोलावून घेणे, संस्थेपर्यंत जावून या रूग्णांना पोहचविणे. ही सर्व कामे करताना कोणाचीही मदत झाली नाही. तरीही त्रागा न करता संयमाने तीने हे काम केले. आजही तीचे हे समाजसेवेचे व्रत सुरू आहे. कुणाही रूग्णाला, भिकाऱ्याला मदतीची गरज लागत असल्याचे कळताच ती आपली सर्व कामे बाजूला ठेवून व स्वखर्चाने पुढे येते. रस्त्यावरच्या भिकाऱ्याला तहान लागली असताना मागूनही कोणी पाणी देत नाही. हे चित्र तीला अनेक वेळा दिसले. तेंव्हापासून ती आता कायम आपल्या पर्समध्ये पाण्याची बाटली ठेवते.  कुणी भिकारी अन्न मागताना दिसला तर स्वतः उपाशी राहून ती आपला डब्बा खायला देते. वेळप्रसंगी पैसे खर्च करून काहीतरी अन्न देते. कुणाला कपड्यांची गरज असेल तर कपडे देते. एवढेच नाहीतर रस्त्यातील जखमी मुक्या प्राण्यांनाही ती स्वखर्चाने मदत करते. रेखा व तीची मैत्रीण सुशिला पुजारी दरवर्षी रक्षाबंधनला ससून मधील रूग्णांना राख्या बांधून गोडधोड देतात. विविध रूग्णालये, पोलीस ठाणे, रूग्णवाहिका, समाजसेवी संस्था आदींचे संपर्क क्रमांक तीने जवळ ठेवले आहेत.

हडपसर, पंधरानंबर येथील एका झोपडीवजा खोलीत रेखा भावासोबत राहत आहे. तसा भावाचा तीला काही अधार नसल्याचे तिच्या बोलण्यातून जाणवते. त्यासाठी ती जवळच एका छोट्याशा कंपनीत काम करते. या पगारात भागत नसल्याने तसेच सामाजिक जाणीवेपोटी घरातील स्वयंपाक व इतर कामे उरकून रात्री पुन्हा ती काम असेल त्या ठिकाणी रूग्णसेवा करण्यासाठी जाते. सकाळी घरी येवून सर्व कामे उरकून पुन्हा कंपनीत जाते. गेली कित्येक वर्षापासूनचा तीचा हा क्रम सुरू आहे. अशा व्यस्त दिनक्रमातही रेखाचे संवेदनशील मन गेली काही वर्षांपासून निर्भयपणे, निःस्वार्थी आणि त्यागी भावनेने दुसऱ्यांसाठी अक्रंदत असताना दिसते. 

रेखा म्हणते,""आपले संत सांगतात की आपल्या पायाखाली कीडा मुंगीही चिरडली जावू नये इतके हळू चाला. मात्र, रस्त्यावर दिसणारे दुःख आपण केवळ उघड्या डोळ्यांनी पाहत राहतो. ऐपत असतानाही मदतीसाठी पुढे जाणारे कमी दिसतात. आपली भाऊ-बहीण, आई-वडील, आजोबा-आजींसारखी दुःखी माणसे पाहूनही आपले मन हेलावत नाही याची खंत वाटते. दाखविण्यासाठी हजारो रूपयांचा इव्हेंट करणारे या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. मला याची कायम जाणीव आहे. ही कामे करताना नोकरी, पैसे, जीव या कशाचीही पर्वा मी करीत नाही. कुणाचीही भिती बाळगत नाही. आपली दैनंदिनी सांभाळूनही अनेक छोटी-छोटी सामाजिक कामे आपण करू शकतो. त्यासाठी कोणत्याही कार्यक्रमाची गरज नाही. रूग्णालयात, बसमध्ये, रस्त्यावर अशा अनेक ठिकाणी वृध्दांना, रूग्णांना त्यांच्या नातेवाईकांना आपण मदत करू शकतो. एका मनोरूग्णाला अश्रमात सोडण्याच्या प्रक्रियेत पोलीसांची मदत घेतली होती त्यावेळी पोलीसांची जबाबदारी असतानाही माझ्याशी बोलण्यासाठी ते फोन करण्याऐवजी मीसकॉल देत होते. त्यावेळी वाईट वाटले. कोणाला अचानक मदत कराताना दिसले की इतर लोकं मला वेडी म्हणतात. मात्र, चांगल काम होत असेल तर कुणी मला वेडी म्हणत असेल तर मलाही ते आवडते. प्रत्येक तरूणाने असे जाता-येता समाजासाठी काही तरी केले पाहिजे, असे मला वाटते.''

Web Title: rekha is doing social work for beggars