दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

milk
milk

भवानीनगर / वालचंदनगर (पुणे) : एकीकडे अतिपाऊस; तर दुसरीकडे महापूर, यामुळे दूध उत्पादनावर झालेल्या प्रतिकूल परिणामामुळे अडचणीत आलेल्या दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दूध पावडरचे वाढलेले दर व घटलेले दूध उत्पादन या पार्श्वभूमीवर राज्यातील आघाडीच्या दूध प्रकल्पांनी येत्या 1 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या दुधाला 30 रुपये ते 30 रुपये 25 पैसे प्रतिलिटर दर देण्याचा निर्णय घेतला आहे. 

सोनाई दूध प्रकल्पाने प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करत 30 रुपये प्रतिलिटर दर देण्याचा निर्णय घेत राज्याच्या दुधाच्या दराची कोंडी फोडली आहे. 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ असलेल्या दुधासाठी हा दर मिळणार आहे. त्यानंतर नेचर डिलाईट डेअरीने थेट तीन रुपयांची वाढ केली. "नेचर'कडून 27 रुपये 25 पैसे प्रतिलिटर दर मिळत होता. तो आता 30 रुपये 25 पैसे प्रतिलिटर जाहीर केला आहे. 

देशात पावडरचे साठे कमी झाल्याने दुधाचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर पश्‍चिम महाराष्ट्रातील पुराचा फटका बसलेल्या कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यासह इतर भागातील दूध उत्पादन घटल्यानेही त्याचाही परिणाम दुधाच्या दरावर झाला आहे. राज्यात दररोज 90 लाख लिटर दूध ग्राहकांकडून खरेदी केले जाते. त्यामध्ये राज्यातील दूध उत्पादकांच्या 60 लाख लिटर दुधाचा यामध्ये समावेश आहे. आता दूध उत्पादकांना वाढीव दराचा फायदा होणार आहे. 
सध्या बाजारात दूध पावडरचे दर प्रतिकिलो 220 रुपयांवरून 325 ते 340 रुपयांवर गेले आहेत. पावडरचे दर आणखी थोडे वाढतील, असा अंदाज आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना दिलासा देणारे निर्णय दूध प्रकल्प घेऊ लागले आहेत.

विशेष म्हणजे कोणतेच आंदोलन नसताना व दबाव नसताना हे दर वाढल्याने अडचणीच्या काळात दूध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. ही दरवाढ आणखी महिनाभर राहील, असे बोलले जात आहे. 

राज्यात महिनाभर दुधाचा तुटवडा राहील, दुष्काळी स्थिती व पावडरची तेजी याचा विचार करता हे दर वाढविले असून, त्याचा दिलासा शेतकऱ्यांना नक्कीच मिळेल. 
- दशरथ माने, 
प्रमुख सोनाई दूध संघ 
 
चालू वर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी अडचणीमध्ये सापडले होते. मात्र, ऑगस्टपासून शेतकऱ्यांना चांगला दर मिळू लागला आहे. 
- अर्जुन देसाई, कार्यकारी संचालक, 
नेचर डिलाईट डेअरी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com