पुणेकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा 

पांडुरंग सरोदे
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहतूक विभाग कायमच टीकेचा धनी होतो; परंतु याच विभागाने गेल्या काही महिन्यांत शहरात वेगवेगळे प्रयोग, उपक्रम राबवून आवश्‍यक बदल घडवित पुणेकरांना दिलासा दिला आहे.

पुणे - दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहतूक विभाग कायमच टीकेचा धनी होतो; परंतु याच विभागाने गेल्या काही महिन्यांत शहरात वेगवेगळे प्रयोग, उपक्रम राबवून आवश्‍यक बदल घडवित पुणेकरांना दिलासा दिला आहे. ट्रॅफवॉच, चक्राकार मार्ग, बेकायदा पार्किंग हटविणे, संभाजी पूल दुचाकींसाठी खुला करण्यासारखे अनेक उपक्रम, बदलांद्वारे पुणेकरांचे जीवन सुसह्य केले. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारतानाच नियमपालन करणाऱ्या वाहनचालकांबद्दल "आभार'द्वारे कृतज्ञता व्यक्त करीत वाहतूक शाखेने "इमेज बिल्डिंग'वर भर दिला आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे शहराच्या वाहतूकव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. याबरोबरच अरुंद रस्ते, विकासकामे, सण-उत्सवांमुळेही वाहतूक कोंडीत भर पडते. त्यातूनही मार्ग काढण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सकारात्मक पद्धतीने प्राधान्य दिले. 

राबविलेले विविध उपक्रम 

* आभार - नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांबद्दल कृतज्ञता 
* प्रिपेड रिक्षा बूथ - बंद पडलेली योजना पुन्हा सुरू करून प्रवाशांना दिलासा 
* ट्रॅफवॉच - वेबसाइटद्वारे वाहनचालकांना दिशादर्शन 
* लोकअदालत - वाहनचालकांवरील प्रलंबित खटले निकाली काढण्यावर भर 
*चक्राकार वाहतूक - दीप बंगला चौक, घोले रस्ता येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयोग 
* पार्किंगमुक्त रस्ते - बाणेर रस्ता, कोथरूडमधील राजा मंत्री रस्त्यावरील बेकायदा पार्किंग बंद 
* जुना बाजार स्थलांतर - मंगळवार पेठेतील रस्त्यावरील वर्षानुवर्षेची कोंडी फोडण्यासाठी निर्णय 
* तंत्रज्ञानयुक्त वाहने - अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त दुचाकी, टोइंग व्हॅनचा ताफ्यात समावेश 

नागरिकांकडून धन्यवाद 
संभाजी पुलावरून दुचाकी वाहनांना दिवसा जाण्यासाठी वर्षानुवर्षे बंदी होती. मात्र वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी या पुलावरून दुचाकींना ये-जा करण्यासाठी खुला करण्याचा आदेश काढला. त्यांच्या या निर्णयाचे लाखो पुणेकरांनी स्वागत केले. हजारो नागरिकांनी त्याबद्दल आनंद व्यक्त करीत पोलिसांना धन्यवाद दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relief to Punekar from traffic congestion

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: