video :...त्यांचे फोटो पाहून पाणवतात डोळे 

हितेंद्र गद्रे
मंगळवार, 30 जुलै 2019

दौंड तालुक्ययातील यवत परिसरातील नऊ मित्रांचा कोकणतील सहलीवरून परत येताना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे दहा दिवसांपूर्वी (20 जुलै) झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. शालेय जीवनापासून एकत्र असलेल्या हे सर्व मित्र वेगवेगळ्या जाती धर्माचे होते. मात्र, त्यांच्यातील मैत्रीचे नाते घट्ट होते. तसेच, त्यांच्यात सेवाभावही ठासून भरला होता. त्याची प्रचीती त्यांचा आयुष्यातील शेवटच्या सहलीतील एक जुना व्हीडीओ आणि फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने येत आहे.

अपघाती मृत्यू झालेल्या यवत परिसरातील नऊ मित्रांच्या मदतीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल 

यवत (पुणे) : दौंड तालुक्ययातील यवत परिसरातील नऊ मित्रांचा कोकणतील सहलीवरून परत येताना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे दहा दिवसांपूर्वी (20 जुलै) झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. शालेय जीवनापासून एकत्र असलेल्या हे सर्व मित्र वेगवेगळ्या जाती धर्माचे होते. मात्र, त्यांच्यातील मैत्रीचे नाते घट्ट होते. तसेच, त्यांच्यात सेवाभावही ठासून भरला होता. त्याची प्रचीती त्यांचा आयुष्यातील शेवटच्या सहलीतील एक जुना व्हीडीओ आणि फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने येत आहे.

निखळ मैत्री आणि सालस स्वभाचे शालेय जिवनापासून मित्र असलेले हे युवक वर्षा विहारासाठी कोकणात गेले होते. त्यावेळी केलेली मैजमजा सांगण्यासाठी आता त्यांच्यापैकी कोणीच उरलेले नाही. उरलेत केवळ त्यांनी मोबाईलद्वारे काढलेले फोटो आणि व्हीडीओ. त्यांच्या आयुष्यातील अखेरच्या सहलीतील एक व्हीडीओ या युवकांची सेवावृत्ती अधोरेखीत करणारा आहे.

कोकणातील एका अनोळखी ठिकाणी एका अनोळखी शेतकऱ्याची एक गाय रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली होती. पावसामुळे चिखलाच्या राड्यातून त्या गायीला बाहेर पडतला येत नव्हते. तीचा मालक एक मध्यमवयीन कृश शेतकरी होता. तो आपली चिखलात अडकलेली गाय कढण्यास हतबल झाला आहे. अशा बिकट परिस्थीतीत त्याच्या मदतीला कोणीही नव्हते. अशा वेळी तेथून जाणाऱ्या या युवकांनी हे दृष्य पाहिले आणि गाडी थांबवून ते सारे सवंगडी त्या हतबल शेतकऱ्याच्या मदतीला धावले. 
ग्रामिण भागातील या तरूणांना तशी गुराढोरांची माहीती होतीच. यांच्यापैकी अनेकजन शेतकरी कुटुंबातीलच होते. त्यांनी चिखलाचा, पावसाचा किंवा अनोळखी असलेल्या परिसराचा विचार न करता आपल्यातील जागृत असलेल्या सेवाभाने त्या शेतकऱ्यास मदत केली. त्या चिखलामय खड्ड्यातून महत्प्रयासाने त्या गायीस या तरूणांनी बाहेर काढले. त्यामुळे तो शेतकरी आनंदी झाला. त्याच्या आनंदात सहभागी होत या तरूणांनी आपल्या चिखलाने माखलेल्या आवतारासह फोटो काढले. 

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या व्हीडीओ आणि फोटोमधील या निरागस तरूणांना पाहून हृदय भरून आल्या शिवाय राहत नाही. आनंद ही दुसऱ्यास दिल्याने मिळणारी आणि वाढणारी गोष्ट आहे, हा संदेशच जणू हे युवक आपल्या कृतीतून देतात, असे वाटते. शुभम भिसे (कासुर्डी, ता. दौंड), विशाल यादव, निखिल वाबळे, अक्षय वायकर, दत्ता यादव, अक्षय घिगे, नूरमहम्मद दाया, जुबेर मुलाणी, परवेज आत्तार (सर्व रा. यवत, ता. दौंड) या शालेयजिवनापासून एकमेकांचे मित्र असलेल्या युवकांच्या यात समावेश होता. 

वृक्षरोपणातून जपणार स्मृती 
यवत येथील आठ व कासुर्डी येथील एक, अशा नऊ शालेय मित्रांना अपघातात मृत्यू आला. त्यास सोमवार (ता. 29) दहा दिवस झाले. आपापल्या धर्मानुसार त्यांचे विधी पार पडले. माहीती सेवाभावी संस्था व यवत ग्रामस्थांच्या वतीने या नऊ मित्रांच्या स्मृतीप्रित्यार्थ नऊ वृक्षांचे रोपन करण्यात आले आहे. या झाडांच्या संरक्षक जाळीवर त्यांची नावे लावण्यात आली आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: remembering the momories of that nine friends