जलपर्णी काढण्यात "खोडा' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे - उन्हाचा पारा वाढत असताना मुळा, मुठा आणि रामनदीत जलपर्णीदेखील झपाट्याने वाढू लागली आहे. परिणामी, जलपर्णीखाली डासांची उत्पत्ती वाढल्याने नदीलगतच्या भागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंगी, मलेरिया आणि तापाच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर पुणे महापालिकेकडून जलपर्णी काढण्याचे काम सुरू झाले असले, तरी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि खडकी कॅंटोन्मेंटकडून अद्यापही जलपर्णी काढण्यास सुरवात न झाल्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. 

पुणे महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या क्षेत्रातून मुळा, मुठा आणि रामनदी वाहते. या तीनही नद्यांमध्ये गतवर्षी नोव्हेंबर ते मार्चअखेर जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नदीपात्रात थेट सांडपाण्याचा विसर्ग केल्यामुळे प्रदूषित पाण्यात जलपर्णी वाढण्याला पोषक वातावरण तयार झाले आहे. वाहत्या पाण्याला त्यामुळे अडथळा निर्माण झाल्याने डासांची उत्पत्तीदेखील तितक्‍याच झपाट्याने होत असून नदीपात्रालगतच्या नागरी वस्त्यांमध्ये डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांमध्ये ताप, डेंगी, चिकुनगुनिया आणि मलेरियासदृश लक्षणे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कीटक प्रतिबंधक विभागाकडून शहर व उपनगरांत औषध फवारणीसह जलपर्णी काढण्याचे काम सुरू झाले आहे. 

या संदर्भात प्रभारी सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत म्हणाल्या, ""पुणे महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या मुळा, मुठा आणि राम नदीपात्रासह कात्रज आणि पाषाण तलावातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामध्ये काही भाग पिंपरी चिंचवड महापालिका आणि खडकी कॅंटोन्मेंटच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यांनीदेखील जलपर्णी काढण्यात सहकार्य करावे, असे लेखी पत्र त्यांना पाठविले आहे. परंतु त्यांच्याकडून काही ठिकाणी कामाला सुरवात झालेली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेचे उपलब्ध मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीद्वारे जलपर्णी काढण्यात समस्या निर्माण होत आहेत.'' 

- 2018-19 या आर्थिक वर्षासाठी 65 लाख रुपयांच्या निधीची तरतूद 
- मुळा, मुठा आणि रामनदीसह पाषाण व कात्रज तलावात जलपर्णी 
- पंधरा क्षेत्रीय कार्यालयांत जलपर्णी काढण्यासाठी एकूण 120 कर्मचारी तैनात 
- "प्राइड एंटरप्राइज' या खासगी संस्थेला जलपर्णी काढण्याचे काम 
- 13 मोटर बोटच्या साह्याने जलपर्णी काढण्याचे काम सुरू 
- पिंपरी-चिंचवड महापालिका आणि खडकी कॅंटोन्मेंटकडून अद्याप कामाला सुरवात नाही 

Web Title: remove waterleaf Pune Municipal Corporation