त्याचा पुनर्जन्म झाला

ज्ञानेश्वर रायते
मंगळवार, 23 जुलै 2019

बरोबर एक वर्ष होत आले. शहरातील मएसो विद्यालयासमोरील विस्तीर्ण; परंतु रस्त्याच्या कामात तोडलेल्या वडाचा बुंधा शरपंजरी अवस्थेत रस्त्याकडेला पडून होता. "पाश' तुटले आणि माती बाजूला झाली, तरी "नाळ' मात्र तुटली नव्हती. या बुंध्यावर पुन्हा कोंब फुटून बुंध्याला जगण्याचे बळ देत होते. 30 ऑगस्ट रोजी हाच बुंधा वन विभागाच्या कार्यालयाशेजारी नेण्यात आला, त्याचे पुनर्रोपण झाले. आज बारामतीचा हा वड फिरून पुन्हा जन्मलाच नाही, तर दिसामाजी वाढला आहे.

बारामती ः बरोबर एक वर्ष होत आले. शहरातील मएसो विद्यालयासमोरील विस्तीर्ण; परंतु रस्त्याच्या कामात तोडलेल्या वडाचा बुंधा शरपंजरी अवस्थेत रस्त्याकडेला पडून होता. "पाश' तुटले आणि माती बाजूला झाली, तरी "नाळ' मात्र तुटली नव्हती. या बुंध्यावर पुन्हा कोंब फुटून बुंध्याला जगण्याचे बळ देत होते. 30 ऑगस्ट रोजी हाच बुंधा वन विभागाच्या कार्यालयाशेजारी नेण्यात आला, त्याचे पुनर्रोपण झाले. आज बारामतीचा हा वड फिरून पुन्हा जन्मलाच नाही, तर दिसामाजी वाढला आहे.

मागील वर्षी सेवारस्त्याच्या कामात आडवे येत असल्याने भिगवण रस्त्यावरील मएसोसमोरच्या वडाचे झाड तोडण्यात आले. त्याचे खोड बरेच दिवस तसेच पडून होते. जमिनीपासून बाजूला केल्यानंतर ते वठून जाईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्यातून पुन्हा फांद्या उगवू लागल्या. हे झाड तेथून तोडणे हे विकासाच्या भौतिक सुविधांसाठी आवश्‍यक असले, तरी त्याचे पुनर्रोपण होऊ शकते आणि कित्येक उन्हाळे-पावसाळे झेललेले मएसोमध्ये शिकलेल्या शेकडो; नव्हे हजारोंच्या आठवणींमध्ये असलेले झाड पुन्हा जन्मू शकते, अशा प्रतिक्रिया या शाळेत शिकलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या होत्या. हे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच 30 ऑगस्ट रोजी हे झाड नगरपालिका, नगरसेवक, एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडिया संस्थेच्या पुढाकारातून वन विभागाच्या कार्यालयाशेजारी पुनर्रोपण करण्यात आले. आता यास एक वर्ष होत आले आहे. या एका वर्षात वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही या खोडाला झाडात रूपांतरित करण्याचे स्वप्न साकार करताना काळजी घेतली आणि आता या खोडाचे झाड बनू लागले आहे. त्याच्या हिरव्यागच्च पानांनी आता हे खोड चहूबाजूंनी घेरले असून, आणखी काही कालावधीत त्याचे झाड वाढलेले असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Replantaion of Tree