कर्तव्याच्या जाणिवेतून ‘ऋणानुबंध’ जपले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायचे होते. आम्ही झोपडपट्टीत राहायचो. इंजिनिअरिंगचे शुल्क भरणे सोपे नव्हते. मला या संस्थेने शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. माझे शिक्षण पूर्ण झाले आहे. आता मी टीसीएसमध्ये नोकरी करत आहे. मी आता गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणार आहे. 
- अक्षय शिंदे, संगणक अभियंता

वारजे माळवाडी - हुशार; परंतु गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करून स्वावलंबी करणाऱ्या वारजे माळवाडी येथील ऋणानुबंध संस्थेने चार मुलांना शिष्यवृत्ती देऊन ही परंपरा सातव्या वर्षी ही जपली. कर्तव्याची जाण असलेल्या या संस्थेने आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. 

संस्थेची सुरवात एक वेगळ्या वळणावर झाली. सदस्य एकमेकांना नियमित भेटत होते. त्यातून ओळख होत गेली आणि हा ग्रुप तयार झाला. सामाजिक बांधिलकीची जाणीव एक मुख्य दुवा होता. कायद्याचे बंधन म्हणून संस्था रजिस्टर केली. संस्थेचा सातवा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. आतापर्यंत २२ मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे. 

संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत वारजे परिसरातील गणेशभक्तांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. गुलकोज पावडर आणि मूल लहान मुलांना गोळ्यादेखील वाटल्या जातात. दिवाळीत दरवर्षी वृद्धाश्रम व अनाथाश्रमांमध्ये जाऊन फराळ वाटप केले जाते. थंडीमध्ये शहरात रस्त्यावर उघड्यावर असणाऱ्या नागरिकांना ब्लॅंकेटचे वाटप केले जाते. 

संस्थेचे ३० सभासद दर महिना ठराविक रक्कम जमा करतात. वारजे माळवाडी परिसरातील दानशूर व्यक्ती संस्थेला आर्थिक देणगी देतात. मागील सात वर्षांत २२ विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली आहे. यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. पाहिल्या वर्षी मदत केलेली अर्चना शिंदे हिचे नुकतेच केमिकल इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण झाले आहे. 

अशा प्रकारे मदत केलेले सर्व जण उच्चशिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहिले आहेत. पतीचे अचानक निधन झाल्याने घरची परिस्थिती बेताची असलेल्या दोन विधवा महिलांना मदत केली आहे. चार-पाच जणांना वैद्यकीय मदत केली आहे. सुहास शिंदे यांच्या लहान मुलाच्या लिव्हर ट्रान्स्फरसाठी मदत केली आहे. याचा संस्थेच्या प्रत्येक सभासद व देणगीदाराना अभिमान आहे.

माझ्या लहान भावाला हृदयविकाराचा आजार होता. शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. खर्च मोठा होता. आमची परिस्थिती बेताची होती. माझी मैत्रीण दीपाली नवगिरे हिच्याकडून या संस्थेबाबत माहिती मिळाली. ऋणानुबंध संस्थेने ३५ हजारांची मदत केली आणि माझ्या लहान भावाची शस्त्रक्रिया झाली. 
- मोनिका रत्नपारखी, वारजे 

‘हुशार व गरीब विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून शिक्षण घेतात. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्यांची शैक्षणिक संधी वाया जाऊ नये, या जबाबदारी, कर्तव्याची जाणीव ठेवून आम्ही हा उपक्रम हाती घेतला. दरवर्षी फक्त तीन किंवा चार मुलांना मदत प्रत्येकी ५ ते १० हजार रुपयांची मदत करू शकतो. यात दानशूर व्यक्तींचा सहभाग वाढल्यास आम्हाला जास्त मुलांना मदत करता येईल.‘ 
- प्रसाद जानवेकर, अध्यक्ष, ऋणानुबंध सामाजिक संस्था


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Responsibility Runanubandh Organisation Student Help